Maharashtra Election 2019 : प्रचारासाठी दसऱ्याचा मुहूर्त; शुभेच्छा देण्यासाठी उमेदवारांची लागली चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 05:54 PM2019-10-09T17:54:24+5:302019-10-09T17:57:18+5:30

सोशल मीडियावरही उमेदवारांत शुभेच्छा देण्यासाठी चढाओढ लागली होती.

Maharashtra Election 2019: Dussehra idiom for campaign; Candidates fight for the best | Maharashtra Election 2019 : प्रचारासाठी दसऱ्याचा मुहूर्त; शुभेच्छा देण्यासाठी उमेदवारांची लागली चढाओढ

Maharashtra Election 2019 : प्रचारासाठी दसऱ्याचा मुहूर्त; शुभेच्छा देण्यासाठी उमेदवारांची लागली चढाओढ

Next

नांदेड : सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर मंगळवारचा दिवस हा खऱ्या अर्थाने प्रचाराचा पहिला दिवस होता. याच दिवशी दसरा आणि सोबत धम्मचक्र प्रवर्तन दिन असल्याने विधानसभेच्या उमेदवारांनी मतदारांना शुभेच्छा देत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावरही उमेदवारांत शुभेच्छा देण्यासाठी चढाओढ लागली होती.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे बारा दिवस मिळत आहेत. काही उमेदवारांनी निवडणुकीची पूर्वतयारी केलेली असली तरी बहुतांश उमेदवारांचे तिकीट शेवटच्या क्षणी निश्चित झालेले असल्याने अशा नवख्या उमेदवारांना मतदारसंघातील सव्वादोन ते अडीच लाख मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. प्रमुख पक्षांनी प्रचाराचे नियोजन सुरू केले असले तरी अद्यापही प्रचारामध्ये रंग भरलेला नाही. त्यातच दसऱ्यासारखा मोठा सण आणि सोबतीला धम्मचक्र प्रवर्तन दिन असल्याने मंगळवारी उमेदवारांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून दसऱ्याबरोबरच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी पुढाकार घेतला.  दिवसभर व्हॉटसअ‍ॅप, फेसबुकवरही उमेदवारांसह समर्थकांचे शुभेच्छा संदेश फिरत होते. 

दरम्यान, जिल्ह्यातील नऊ मतदारसंघात तब्बल १३५ जण रिंगणात असून सर्वाधिक ३८ उमेदवार नांदेड दक्षिणमध्ये आहेत. त्यामुळे या मतदारसंघात प्रचाराने वेग घेतलेला दिसतो. प्रमुख उमेदवारांसह अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांनीही मंगळवारी गृहभेटीवर भर दिल्याचे दिसून आले. याबरोबरच कॉर्नर बैठकांनाही सुरुवात झाली असून काही उमेदवार मात्र अद्यापही प्रचाराचे नियोजन करण्यातच व्यस्त असल्याचे चित्र आहे. 
दरम्यान, प्रमुख पक्षांकडून जंगी  सभांचे नियोजन सुरू झाले असून त्यानंतरच खऱ्या अर्थाने प्रचारामध्ये रंगत येणार आहे. सध्यातरी मतदारसंघातील प्रत्येक गावात किमान एक भेट व्हावी, यासाठी उमेदवारांचे प्रयत्न सुरू आहेत.

उमेदवारांना पावसाची भीती
यंदा राज्यभरात चांगला पाऊस झालेला आहे. नांदेड जिल्ह्यातही पावसाने ८२५ मि.मी.चा टप्पा पार केलेला आहे. मराठवाड्यात परतीचा पाऊस चांगला पडतो. त्यातच हवामान विभागाने बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असे तीन दिवस पावसाचे असल्याचे म्हटले आहे. या दिवसात मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मोठा पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला असल्याने प्रमुख पक्षांसह उमेदवारांचीही चिंता वाढलेली आहे. यंदा प्रचारासाठी मोजकेच दिवस मिळत आहेत. त्यातच पावसाने हजेरी लावल्यास प्रचारावर परिणाम होणार आहे. विशेषत: जंगी, सभा व मेळाव्याचे आयोजन करणाऱ्यांनी पावसाची धास्ती घेतली आहे. 

Web Title: Maharashtra Election 2019: Dussehra idiom for campaign; Candidates fight for the best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.