'इनकमिंग' झालेल्यांना भाजपाचा रंग लागेल; त्यांचा भाजपाला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 14:32 IST2019-09-24T14:29:56+5:302019-09-24T14:32:19+5:30
चार जिल्ह्यासाठीच्या मिडिया सेंटरचे उद्घाटन

'इनकमिंग' झालेल्यांना भाजपाचा रंग लागेल; त्यांचा भाजपाला नाही
नांदेड : मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांच्या बाबत आम्ही युती म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी भाजपाची ताकद वाढलेली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही लोकसभा निवडणुकीचाच रिप्ले दिसेल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.
तावडे यांच्या हस्ते नांदेड येथे नांदेडसह लातूर, उस्मानाबाद, हिंगोली या चार जिल्ह्यांसाठीच्या मिडिया सेंटरचे मंगळवारी उद्घाटन झाले. तत्पूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात मेगा भरती झाल्याचे म्हटले जाते. वस्तुस्थिती तशी नाही. ज्या मतदारसंघात भाजपाची ताकद कमी होती अशा राज्यभरातील १३ ठिकाणीच काँग्रेस-राष्ट्रवादीमधील काहींना प्रवेश दिलेला आहे. हे प्रवेशही विचारपूर्वक देण्यात आलेले आहेत. पक्षात आलेल्यांना भाजपाचा रंग लागेल. येणाऱ्यांचा रंग भाजपाला लागणार नाही, असेही ते म्हणाले.
वेळेत योग्य माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. त्यामुळेच राज्यात सात ठिकाणी विभागीय मिडिया सेंटर्सची स्थापना करण्यात येत असून या प्रत्येक सेंटर्समधून परिसरातील २० ते २५ मतदारसंघाचे कामकाज चालणार असल्याची माहिती तावडे यांनी दिली. चुकीची माहिती खोडूनन काढण्याबरोबरच सकारात्मक माहिती तातडीने माध्यमापर्यंत पोहचविण्याचे काम या माध्यम केंद्राद्वारे होणार असल्याचे ते म्हणाले.