अमर रहे! देगलूरचे सुपुत्र शहीद जवान सचिन वनंजे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 15:53 IST2025-05-09T15:53:19+5:302025-05-09T15:53:51+5:30

जवान सचिन वनंजे कर्तव्यावर असताना श्रीनगर येथे 6 मे रोजी शहीद झाले होते.

Long live the immortal! Martyred soldier Sachin Vananje, son of Degalur, cremated with state honours | अमर रहे! देगलूरचे सुपुत्र शहीद जवान सचिन वनंजे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अमर रहे! देगलूरचे सुपुत्र शहीद जवान सचिन वनंजे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

- शेख शब्बीर
देगलूर:
"सचिन वनंजे अमर रहे!", "भारत माता की जय!" अशा घोषणा देत देगलूरमधील शहीद जवान सचिन वनंजे (29) यांच्यावर शुक्रवारी सकाळी 10:30 वाजता नगरपरिषद शेजारील मोकळ्या जागेत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान सचिन वनंजे कर्तव्यावर असताना श्रीनगर येथे 6  मे रोजी एका अपघातात शहीद झाले होते.

सचिन वनंजे हे देगलूर तालुक्यातील तमलूर येथील मूळ रहिवासी असून सध्या फुलेनगर, देगलूर येथे वास्तव्यास होते. जम्मू-काश्मीर येथे आपल्या सहकाऱ्यांसह नियोजित पोस्टकडे जात असताना त्यांच्या सैनिकी वाहनाचा खोल दरीत अपघात होऊन मंगळवार, दि. 6 मे रोजी ते शहीद झाले. त्यांचे पार्थिव शुक्रवारी पहाटे 4 वाजता हैदराबादहून देगलूर येथे त्यांच्या घरी पोहोचवण्यात आले.

सकाळी 8:30 वाजता फुलांनी सजवलेल्या सैनिकी वाहनात त्यांची अंत्ययात्रा सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, अण्णाभाऊ साठे चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, गांधी चौक, देगाव नाका, संत रविदास चौक आदी मार्गे अंत्ययात्रा नगरपरिषदेच्या शेजारी पोहोचली. येथे सैन्य दलाच्या वतीने हवेत गोळीबार करत मानवंदना देण्यात आली. बौद्ध धर्मगुरु भंते रेवतबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली अंत्यविधी पार पडला. 

या अंत्यसंस्कारावेळी खासदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार जितेश अंतापुरकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी संकेत गोसावी, तहसीलदार भरत सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक मारोती मुंडे, माजी आमदार, राजकीय नेते, अधिकारी-कर्मचारी, तसेच हजारोंचे जनसमुदाय उपस्थित होता.

शहीद जवान मागे ठेवून गेले कुटुंब
सचिन वनंजे यांनी 2017 मध्ये भारतीय सैन्य दलात प्रवेश केला होता. त्यांची पहिली नियुक्ती सियाचीनमध्ये झाली होती. त्यानंतर त्यांनी जालंधर (पंजाब) आणि सध्या श्रीनगर येथे सेवा बजावली होती. मार्च महिन्यात ते सुट्टीवर आले होते आणि एप्रिलमध्ये पुन्हा ड्युटीवर हजर झाले. त्यांचे लग्न 2022 मध्ये झाले असून त्यांना फक्त आठ महिन्यांची मुलगी आहे. त्यांच्या आई गृहिणी असून वडील खाजगी वाहन चालक आहेत.

Web Title: Long live the immortal! Martyred soldier Sachin Vananje, son of Degalur, cremated with state honours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.