लोहा पंचायत समिती पोटनिवडणुकीत भाजपच्या मजलसाबाई उबाळे विजयी; आमदार चिखलीकरांनी राखले वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 14:34 IST2018-04-07T14:34:13+5:302018-04-07T14:34:13+5:30
पंचायत समितीच्या मारतळा गणाच्या पोट निवडणुकीत भाजपच्या मजलसाबाई माधव उबाळे या विजयी झाल्या.

लोहा पंचायत समिती पोटनिवडणुकीत भाजपच्या मजलसाबाई उबाळे विजयी; आमदार चिखलीकरांनी राखले वर्चस्व
लोहा (नांदेड ) : पंचायत समितीच्या मारतळा गणाच्या पोट निवडणुकीत भाजपच्या मजलसाबाई माधव उबाळे या विजयी झाल्या. त्यांनी शिवसेनेच्या प्रतिस्पर्धी उमेदवार गिरीजा भास्कर ढगे यांचा ६८३ मतांनी पराभव केला.
तालुक्यातील मारतळा पंचायत समिती गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. या आधी या गणातून शिवसेनेच्या सुलोचना ढेपे निवडून आल्या होत्या. मात्र, वैयक्तीक कारणास्तव त्यांनी राजीनामा दिला. यामुळे झालेल्या या पोटनिवडणुकीत आमदार प्रताप पाटील चिखलिकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या मजलसाबाई उबाळे यांनी निवडणूक लढवली. तर शिवसेनेतर्फे गिरीजा ढगे या उमेदवार होत्या.
तांत्रिकदृष्ट्या शिवसेना आमदार असलेल्या चिखलीकर यांना भाजप उमेदवारास निवडून आणणे राजकीय दृष्ट्या आवश्यक होते. यामुळे निवडणुकीची सारी सूत्रे त्यांनी एकहाती राबवत भाजप उमेदवाराचा विजय खचून आणण्यात महत्वाची भूमिका निभावली. मत मोजणीत भाजपच्या मजलसाबाई उबाळे यांना ३८७९, शिवसेनेच्या गिरीजा ढगे यांना ३१९६ तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्वशिलाबाई हंबर्डे यांना २४०१ मते मिळाली. यासोबत एकूण ९६१५ मतदानापैकी १३९ मतदारांनी नोटाला पसंती दिली. तहसील कार्यालयात निवडणुक निर्णय अधिकारी प्रभोदय मुळे व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी डॉ.अशिषकुमार बिरादार यांच्या उपस्थितीत मतमोजणी झाली.