धावत्या टेम्पोच्या कॅबीनचे लॉक तुटले; बाहेर फेकल्या गेल्याने व्यापाऱ्याचा चिरडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 13:01 IST2020-02-27T12:56:56+5:302020-02-27T13:01:27+5:30

उमरीतील तरूण व्यापाऱ्याचा टेम्पोखाली चिरडून जागीच मृत्यू

The locks of the cabin of the running tempo were broken; Trader's death due to being thrown out | धावत्या टेम्पोच्या कॅबीनचे लॉक तुटले; बाहेर फेकल्या गेल्याने व्यापाऱ्याचा चिरडून मृत्यू

धावत्या टेम्पोच्या कॅबीनचे लॉक तुटले; बाहेर फेकल्या गेल्याने व्यापाऱ्याचा चिरडून मृत्यू

उमरी : धावत्या टेम्पोची कॅबीनचे लॉक अचानक तुटल्याने त्यातून पडून एका तरुण व्यापाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी ( दि. २७ ) सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. नाजोद्दीन ताजोद्दीन बाशुमिया ( ३४ ) असे मृताचे नाव आहे. या अपघातात टेम्पोचालक आणि दुचाकीस्वार असे  दोघेजण बालंबाल बचावले आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, नाजोद्दीन ताजोद्दीन बाशुमिया हे आपल्या मालकीच्या टेम्पोच्या दुरुस्तीसाठी नांदेडला जात होते. प्रवासादरम्यान उमरी -  मुदखेड जवळील हनुमान मंदिराच्या उतारावर टेम्पोच्या कॅबीनचे लॉक अचानक तुटले. उतार असल्याने कॅबीन समोर उलटली गेली. यावेळी कॅबीनची काच फुटल्याने त्यातील नाजोद्दीन ताजोद्दीन बाशुमिया हे बाहेर फेकले गेले. यानंतर काही कळण्याच्या आत रस्त्यावर पडलेल्या नाजोद्दीन ताजोद्दीन बाशुमिया यांच्यावर अनियंत्रित झालेला टेम्पो गेला. चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर टेम्पो चालक मात्र बालंबाल बचावला आहे.

दरम्यान, नांदेडहून उमरीकडे येणाऱ्या बालाजी शिंदे या तहसील  कर्मचाऱ्याच्या दुचाकीवर अनियंत्रित झालेला टेम्पो कोसळला. यावेळी प्रसंगावधान राखून शिंदे यांनी दुचाकी सोडून उडी मारल्यामुळे तेही या अपघातातून बालंबाल बचावले. मात्र त्यांच्या दुचाकीचा चुराडा झाला. 

Web Title: The locks of the cabin of the running tempo were broken; Trader's death due to being thrown out