शेतात जाण्यासाठी नदीतून जीवघेणा प्रवास, पुलाअभावी शेकडो हेक्टर जमीन पेरणी अभावी पडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 07:38 IST2025-01-16T07:38:41+5:302025-01-16T07:38:52+5:30

पर्यायी पुलासाठी अनेकवेळा शासनाला साकडे घालूनही हा प्रश्न सुटलेला नाही.

Life-threatening journey across the river to reach the fields, hundreds of hectares of land lie uncultivated due to lack of bridges, deglur | शेतात जाण्यासाठी नदीतून जीवघेणा प्रवास, पुलाअभावी शेकडो हेक्टर जमीन पेरणी अभावी पडीत

शेतात जाण्यासाठी नदीतून जीवघेणा प्रवास, पुलाअभावी शेकडो हेक्टर जमीन पेरणी अभावी पडीत

- शेख शब्बीर 

देगलूर (जि. नांदेड) : मन्याड नदीच्या एका बाजूला गाव अन् एका बाजूला शेत असल्याने शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. जवळपास बारमाही वाहणाऱ्या मन्याड नदीला पावसाळ्यात कायम पूरसदृश स्थिती असते. त्यामुळे शेकडो हेक्टर जमीन पेरणीअभावी पडीत राहते. पर्यायी पुलासाठी अनेकवेळा शासनाला साकडे घालूनही हा प्रश्न सुटलेला नाही.

दोन तालुक्यांतील ५०० एकर शेतजमीन 
मन्याड नदीच्या दोन्ही बाजूला बिलोली तालुक्यातील गळेगाव व देगलूर तालुक्यातील वझरगा, तुपशेळगाव, आलूर, शहापूर, लिंबा या गावातील शेतकऱ्यांची जवळपास ५०० एकर शेतजमीन आहे. मात्र, या शेतकऱ्यांना रस्ता नसल्याने नदीपात्रातूनच जीव मुठीत धरून ये-जा करावी लागते.    

अनेकांना पेरणीच करता आली नाही 
मागील वर्षी मन्याड नदीचे खोलीकरण व रुंदीकरण केल्याने पाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे यंदा जवळपास ३५ ते ४० टक्के शेतकऱ्यांनाच पेरणी करता आली आहे.  शासनाने या मन्याड नदीवर एक लहानसा पूल तयार करून द्यावा, जेणेकरून शेतकऱ्यांना सुरक्षित शेतात जाऊन शेताची मशागत, पेरणी करता येईल, असे निवेदन वझरगा येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. 

पुरामुळे शेतात अडकतात शेतकरी
ज्या-ज्या वेळेस मन्याड नदीला पूर येतो, त्यावेळी नदीकाठावरील शेतकऱ्यांना दोन-दोन दिवस शेतातच अडकून राहावे लागते. त्यावेळी शासनाकडून मोठी कसरत करीत त्या शेतकऱ्यांना बोटीद्वारे सुखरूप बाहेर आणले जाते. अशा घटना दर पावसाळ्यात घडतात. त्यामुळे नदीवर पूल बांधण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. 

शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी नदीतूनच जावे लागते. यंदा पुरामुळे शेतकरी पेरणीपासून वंचित राहिले. त्यामुळे शासनाने तत्काळ पूल बांधून द्यावा.  
मष्णाजी औरादे, सरपंच वझरगा.

Web Title: Life-threatening journey across the river to reach the fields, hundreds of hectares of land lie uncultivated due to lack of bridges, deglur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nandedनांदेड