मृत्यूच्या भीतीपेक्षा जीवनाचे मोल ओळखूया - डॉ. प्रभाकर देव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:14 IST2021-06-06T04:14:27+5:302021-06-06T04:14:27+5:30

नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने समाजात सकारात्मकता वाढावी या उद्देशाने सुरू केलेल्या मिशन पॉझिटिव्ह सोच या अभियानाच्या निमित्ताने ज्येष्ठ इतिहास ...

Let's recognize the value of life rather than the fear of death - Dr. Prabhakar Dev | मृत्यूच्या भीतीपेक्षा जीवनाचे मोल ओळखूया - डॉ. प्रभाकर देव

मृत्यूच्या भीतीपेक्षा जीवनाचे मोल ओळखूया - डॉ. प्रभाकर देव

नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने समाजात सकारात्मकता वाढावी या उद्देशाने सुरू केलेल्या मिशन पॉझिटिव्ह सोच या अभियानाच्या निमित्ताने ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. प्रभाकर देव यांनी आपले भावविश्व व्यक्त करून ज्येष्ठांना आश्वासकता दिली.

ज्यांनी वयाची साठी ओलांडून ज्येष्ठांचा मान घेतला आहे त्यांनी मृत्यूच्या या भीतीतून बाहेर पडायला हवे. एकदा मृत्यूचे मोल कळले की भीती आपोआप गळून जाते. रोज जगून भीतीने मरण्यापेक्षा आजवर आपल्याला ज्या काही गोष्टी करता आल्या नाहीत त्या करून पाहण्याचा प्रयत्न केला तर कोणतेच भय मनाला शिवणार नाही, असे डॉ. देव म्हणाले. इतिहासाच्या दृष्टिकोनातून आजच्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीकडे पाहिले तर पूर्वीच्या काळातील भावविश्व अगोदर आपल्याला समजून घ्यावे लागेल. पन्नास वर्षांपूर्वीचे जग आणि आजचे जग यात जमीन-अस्मानचा फरक आता पडला आहे. यात भौतिक सोयीसुविधा असलेला वर्ग व ज्यांच्यापर्यंत कनेक्टिव्हिटी पोहचली नाही, असा वर्ग या द्विस्तरावर विभागणी करावी लागेल.

ज्यांची बोटे मोबाईलच्या स्क्रीनवर स्थिरावली आहेत त्यांना आता जगाचे अंतर राहिले नाही. जे व्यक्ती याचा जसा उपयोग करून घेत आहेत ते भावविश्व प्रत्येकाला मिळत आहे. असंख्य ज्येष्ठ नागरिक आज या आजच्या कनेक्टिव्हिटीशी जोडले गेले आहेत. पण ही कनेक्टिव्हिटी केवळ व्हॉट्सॲपपुरतीच मर्यादित असेल आणि ठराविक चौकटीतीलच असेल तर तुमचे भावविश्वही तेवढ्याच चौकटीत बंदिस्त होईल. या साऱ्या चौकटीच्या बाहेर पडून आजच्या काळात ज्येष्ठांना खूप काही वाचता येईल. अनेकांनी आपल्याला जसे जमेल तसे व त्या शब्दात लिहिण्यासाठी प्रयत्न केला पहिजे. आपण जे आयुष्य वेचले ते लिहिले पाहिजे. हा क्रम जर ज्येष्ठांनी निवडला तर कोरोनाच्या भयातून आपण केेव्हा भयमुक्त झालो हे लक्षातही येणार नाही. आजार होऊ नये याची काळजी घेतली तर भयमुक्तीचा मार्ग सहज मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आजही ग्रामीण भागामध्ये जिथे व ज्यांच्यापर्यंत कनेक्टिव्हिटी पोहचली नाही त्यांची स्थिती ५० वर्षापूर्वीचच आहे. या काळात ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक कोरोनाच्या भीतीच्या सावटाखाली आले नाहीत. एक सश्रद्ध भावना त्यांच्यात असल्याने आत्मबलातून त्यांनी सुरक्षिततेला प्राधान्य दिले असावे. पूर्वीच्या काळी प्लेग, देवी या गावेच्या गावे उदध्वस्त करणाऱ्या साथी आल्या तेेव्हा माणूस हा सश्रद्धेतूनच सावरला हे लक्षात घ्यावे लागेल. साथीच्या आजाराला देवपण देणारी भावना ही सुरक्षिततेसाठी त्यांनी घेतलेला मंत्र होता, असे डॉ. देव यांनी स्पष्ट करून त्या काळातील मानसिक धैर्याचे विश्लेषण केले. भक्तीच्या मार्गात विवेक असला की माणसे सावरून जातात हा आपला इतिहास विसरता येणार नाही.

मानवी अस्तित्व हे पंचमहाभूताचा एक भाग आहे. जल, अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी ही पाच तत्त्वे म्हणजे पंचमहाभूते अशी भारतीय तत्त्वचिंतनाची भूमिका आहे. कणाकणात ईश्वर आहे, प्रत्येकात ईश्वराचा अंश आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. मृत्यू म्हणजे आपल्या मूळ अस्तित्वात एकरूप होणे आहे, मिसळणे आहे. ज्येष्ठ नागरिकांनी मृत्यूची भीती काढून टाकण्यासाठी एवढे जरी समजून घेतले तरी ते पुरेसे आहे. जो निसर्गाशी जवळ आहे, जो शेता-मातीत काम करणारा आहे तो आपल्या खेड्यापाड्यातील बांधव या गोष्टी, हे तत्त्व चांगले समजून आहे म्हणून तो भीतीपासून दूर आहे. निर्भयता ही जीवनाला अर्थ देणारी गोष्ट आहे. “वेळच मिळाला नाही” हे ज्यांचे शब्द होते त्यांनी आतातरी निश्चिंत होऊन आवडीच्या गोष्टींमध्ये वेळ घालवून मनसोक्त जगावे, असे डॉ. देव यांनी सांगून ज्येष्ठांना नवे बळ दिले.

Web Title: Let's recognize the value of life rather than the fear of death - Dr. Prabhakar Dev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.