नांदेड-वारंगा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू, अर्धापूर परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 16:41 IST2026-03-11T16:40:25+5:302026-03-11T16:41:18+5:30
वनविभागाकडून अज्ञात वाहनाचा शोध सुरू, वन्यजीव प्रेमींत हळहळ

नांदेड-वारंगा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू, अर्धापूर परिसरात खळबळ
- गोविंद टेकाळे
अर्धापूर (जि. नांदेड): नांदेड-वारंगा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ वरील मौजे शनी फाट्याजवळ बुधवारी (११ मार्च) मध्यरात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दीड वर्षीय बिबट्याचा (मादी पिल्लू) दुर्दैवी मृत्यू झाला. रात्री १२:४५ वाजेच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना ही भीषण घटना घडली.
डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडकडून वारंगाकडे जाणाऱ्या एका सुसाट वाहनाने मादी बिबट्याला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, बिबट्याच्या डोक्याला गंभीर इजा होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक केशव वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक भरत खेलबाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल रासने आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
शवविच्छेदनानंतर दहन
वनविभागाने मृत बिबट्याला ताब्यात घेऊन भोकर येथील TTC केंद्रात नेले. गुरुवारी सकाळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर. व्ही. सुरेवाड, डॉ. संजय शेळके व डॉ. अविनाश बुन्नावार यांच्या पथकाने शवविच्छेदन केले. त्यानंतर सर्व नियमांचे पालन करून मृत बिबट्याचे दहन करण्यात आले. या प्रकरणी वनविभागाने अज्ञात वाहन चालकाविरुद्ध 'वनगुन्हा' (क्र. ०१/२०२६) नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
वन्यजीवांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर
उन्हाळ्यामुळे पाण्याचा शोध घेण्यासाठी वन्यप्राणी महामार्गाकडे येत आहेत. रात्रीच्या वेळी वाहनांचा वेग जास्त असल्याने हे अपघात घडत आहेत. प्रशासनाने वन्यजीवांसाठी तातडीने पाणवठे तयार करावेत, अशी मागणी वन्यजीव प्रेमींकडून होत आहे.