Kinwadi NCP's impenetrable fort | किनवट राष्ट्रवादीचा अभेद्य किल्ला
किनवट राष्ट्रवादीचा अभेद्य किल्ला

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीनंतर सेना-भाजपात संचारला उत्साह

गोकुळ भवरे।
किनवट : दोन तालुक्यांचा समावेश असलेल्या किनवट मतदारसंघात माहूरची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसकडे तर किनवटची सत्ता भाजपकडे आहे़ आता आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा हा अभेद्य किल्ला सर करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने व्यूहरचना चालविली आहे़
आदिवासी बंजारा बहुल किनवट विधानसभा मतदारसंघात नऊ वेळा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेला किनवट विधानसभा मतदारसंघ भाजप-सेना युती हिसकावून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे़ मात्र भाजपात अर्धा डझनहून अधिक इच्छुक असल्याने उमेदवारी न मिळालेल्यांची भूमिका काय असणार? हे काळच सांगेल़
राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडी आणि भाजप-सेना युती झाली नाही अणि २०१४ प्रमाणे स्वतंत्र लढले तर आघाडी, युतीला येत्या काळात वंचित बहुजन आघाडी व माजी आमदार भीमराव केराम यांची अपक्ष उमेदवारी डोकेदुखी ठरेल. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेल्या यशानंतर भाजपासाठी असलेल्या या मतदारसंघावर शिवसेना दावा करीत असल्याचे त्यांच्या हालचाली वरून दिसून येत आहे़
लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार हेमंत पाटील यांना किनवट विधानसभा मतदारसंघात पन्नास टक्केच्यावर मतदान मिळाल्याने शिवसेनेचे मनोबल वाढले आहे़ हा मतदारसंघ शिवसेनेला सुटावा, यासाठी फिल्डिंग लावली जात आहे़ किनवट मतदारसंघात भाजप लयास गेली होती़ भाजपचे कमळ फुलवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जवळचे मानले जाणारे भाजप नेते अशोक सूर्यवंशी पाटील यांनी प्रयत्न करून किनवट नगरपरिषदेवर व पंचायत समितीवर भगवा फडकवून आपली ताकद दाखवून दिली़ मात्र असे असतानाही एक गट त्यांचे नेतृत्व मानायला तयार नाही़ ते नेहमी त्यांच्या विरोधात सक्रिय असतात़ आता तर धरमसिंग राठोड व इतर अर्धा डझन भाजपाची उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक आहेत़ शिवसेनेला हा मतदारसंघ सुटला तर ज्योतीबा खराटे, युवा नेते सचिन नाईक हे दोघे इच्छुक आहेत़
राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडीची उमेदवारी विद्यमान आ़ प्रदीप नाईक यांना बहाल होईल; पण गटबाजी उफळलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची भूमिका ‘पायात पाय’ घालण्याची राहील हे आ़ प्रदीप नाईकांना ठाऊक आहे़ पण काँग्रेसचा एक प्रबळ गट मात्र नाईकांच्या बाजूने भक्कमपणे राहणार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीला व भाजप सेना युतीला अपक्ष उमेदवारी दाखल करणारे माजी आ़भीमराव केराम व बहुजन वंचित आघाडी डोकेदुखी ठरेल माजी आ़भिमराव केराम यांना एखाद्या पक्षाने उमेदवारी दिली तर मग मात्र निवडणुकीचे चित्र फार वेगळे राहील हे तितकेच खरे़


Web Title: Kinwadi NCP's impenetrable fort
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.