बुधवारी रुजू अन् गुरुवारी सेवानिवृत्त! पुन्हा चार पोलिस निरीक्षकांना ‘अवटघटके’ची पदोन्नती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 19:52 IST2025-07-30T19:51:50+5:302025-07-30T19:52:37+5:30
‘औटघटके’ची पदोन्नती देण्याच्या महासंचालक कार्यालयाच्या परंपरेवर पोलिस वर्तुळात नाराजीचा सूर पाहायला मिळतो.

बुधवारी रुजू अन् गुरुवारी सेवानिवृत्त! पुन्हा चार पोलिस निरीक्षकांना ‘अवटघटके’ची पदोन्नती
नांदेड : पोलिस अधिकाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या काही तासांपूर्वी पदोन्नती देण्याची पोलिस महासंचालक कार्यालयाची परंपरा जुलै महिन्यातही कायम आहे. मंगळवारी चार पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीचे आदेश सायंकाळी जारी करण्यात आले. हे पोलिस निरीक्षक बुधवारी पोलिस उपअधीक्षक पदावर रुजू होतील आणि गुरुवारी सायंकाळी सेवानिवृत्त होतील.
पदोन्नती मिळालेले चारपैकी तीन पोलिस निरीक्षक हे बृहन्मुंबईचे आहेत. त्यामध्ये जीवन खरात, दयानंद नायक, दीपक दळवी यांचा समावेश आहे. त्यांना त्याच शहरात उपअधीक्षक पदावर नियुक्ती दिली गेली आहे. तर पांडुरंग पवार हे जळगावचे असून, त्यांना तेथेच आर्थिक गुन्हे शाखेत नेमले गेले आहे. ‘औटघटके’ची पदोन्नती देण्याच्या महासंचालक कार्यालयाच्या परंपरेवर पोलिस वर्तुळात नाराजीचा सूर पाहायला मिळतो. जून महिन्यातही अशाच पद्धतीने सेवानिवृत्ती तोंडावर आलेल्या पोलिस निरीक्षकांना २७ तारखेला पदोन्नती दिली गेली होती. जुलैमध्ये आणखी दोन दिवस पुढे जात २९ तारखेचा मुहूर्त साधला गेला. अवघ्या ४८ तासांसाठी चार पोलिस निरीक्षकांना पदोन्नती देऊन पोलिस उपअधीक्षक बनविले गेले आहे.
आता पुन्हा ऑगस्टची प्रतीक्षा
पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नती यादीला आधीच विलंब झाला आहे. महसुली पसंतीक्रम मागवून दोन महिने लोटत आहेत, तरीही संपूर्ण यादी जारी झाली नाही. किमान जुलै महिन्यात तरी ही यादी जारी होईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात पोलिस उपअधीक्षक होण्यासाठी इच्छुक असलेल्या निरीक्षकांची निराशा झाली. केवळ चौघांच्याच पदोन्नतीचे आदेश आणि तेही अखेरच्या क्षणी काढले गेले. इतरांना पुन्हा आता ऑगस्टची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सूत्रानुसार, महासंचालक कार्यालयाकडून शासनाकडे पदोन्नतीची यादी पाठविली गेली. मात्र, शासन स्तरावरूनच प्रत्यक्ष यादी जारी करण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात आले.