जायभाये सेवानिवृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:16 IST2021-05-01T04:16:49+5:302021-05-01T04:16:49+5:30
रोहिणी नपते यांना पदोन्नती नांदेड - ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत श्रीमती रोहिणी नपते यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर ...

जायभाये सेवानिवृत्त
रोहिणी नपते यांना पदोन्नती
नांदेड - ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत श्रीमती रोहिणी नपते यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर पदोन्नती मिळाली. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. २०१३ मध्ये त्या पोलीस उपनिरीक्षक म्हणून भरती झाल्या होत्या. पदोन्नती नंतर त्यांची नियुक्ती लातूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात झाली आहे.
रामपूर येथे वणवा पेटला
किनवट - तालुक्यातील रामपूर येथील जंगलात वणवा पेटल्यामुळे वन्यप्राणी व वनसंपत्तीचे मोठे नुकसान होत आहे. वनविभागाचा कोणताही अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाही. जंगलात अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत. सोबतच वनसंपत्ती ही आहे. वन्य प्राण्यांचा निवाराही आहे. वणव्यामुळे प्राणी सैरावैरा पळत राहतात. अशात त्यांची शिकार ही होऊ शकते.
सोनकांबळे सेवानिवृत्त
लोहा - तालुक्यातील श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय गोलेगाव (प. क.) येथील मुख्याध्यापक सुधाकर सोनकांबळे ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले. ११ जून १९९२ रोजी सहशिक्षक म्हणून ते रूजू झाले होते. या दरम्यान त्यांनी माळेगाव यात्रा, हाडोळी आदी ठिकाणीही काम पाहिले. सेवानिवृत्तीबद्दल संस्थेचे सचिव बाबूराव केंद्रे, सहसचिव भानुदास केंद्रे, कमलाकर गुट्टे आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
लॉकडाऊनला विरोध
बिलोली - येथील काही व्यापाऱ्यांनी तहसीलदार वाघमारे यांची भेट घेऊन ३० एप्रिलनंतर लॉकडाऊन पाळणार नाही असे सांगून निवेदन दिले. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष विजय कुंचनवार, पुरुषोत्तम ज्ञानेश्वर, प्रशांत पेन्सलवार, लक्ष्मण रामोड, इसाक शेख अहमद, हेमंत कुंचनवार, दत्तात्रय आलूरकर, राहुल कलमुर्गे, सत्यजीत तुप्तेवार यांची नावे आहेत.
स्वस्त धान्य दुकानदारांचा इशारा
हदगाव - स्वस्त धान्य दुकानदारांना विम्याचे कवच द्यावे, या व अन्य मागण्यांसाठी १ मे पासून सर्व दुकानदार संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. या संदर्भातील निवेदन संघटनेचे अध्यक्ष शेषराव कदम, जिल्हा सचिव मिलिंद कंधारे यांनी तहसीलदार जीवराज डापकर यांना दिले. तालुक्यात १९६ स्वस्त धान्य दुकाने आहेत. राज्यात ९७ दुकानदारांचा कोराेनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय उघड्यावर पडले आहे असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
कोरोना लसींचा तुटवडा
हिमायतनगर - तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण झाला असून काही केंद्र केवळ लस अभावी बंद पडले आहेत. एकीकडे आरोग्य विभाग, सरपंच, अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामसेवक कोरोना लसीकरण घ्यावे असे सांगत आहेत तर दुसरीकडे लस नसल्यामुळे केंद्र बंद करण्याची वेळ आली. शहरासह ग्रामीण भागातील सरासरी ३०० नागरिक लस टोचून घेत होते. ३० एप्रिल रोजी सरसम प्रा.आ. केंद्रात दोन तर चिंचोर्डी आरोग्य केंद्रात केवळ ८० लस शिल्लक होत्या.
रक्तदान शिबिर
कृष्णूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कृष्णूर येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी सरपंच प्रतिनिधी व जयसिंगराव जाधव यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण झाले. कार्यक्रमाला पर्बतराव पाटील, भुजंगराव पांडे, लक्ष्मणराव जाधव, प्रल्हाद पिंपळे, रमाबाई पिंपळे, बळवंत जाधव, टेकोजी जाधव, संदीप काकडे आदी उपस्थित होते.