खताच्या किमतीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:40 IST2019-06-18T00:38:51+5:302019-06-18T00:40:04+5:30
खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज झाला असला तरी पावसाचे आगमन अद्याप झाले नाही, त्यामुळे आभाळाकडे डोळे लागले आहेत़

खताच्या किमतीत वाढ
नांदेड : खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज झाला असला तरी पावसाचे आगमन अद्याप झाले नाही, त्यामुळे आभाळाकडे डोळे लागले आहेत़ तर दुसरीकडे खताच्या किंमती वाढल्या आहेत़ निसर्ग व मानवनिर्मित संकटाचा सामना यंदाही शेतकऱ्यांना करावा लागणार आहे़
दुष्काळाने खचलेल्या शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे़ शेतीची मशागत केल्यानंतर पेरणीसाठी सर्व तयारी करण्यात आली आहे़ मात्र यंदाही पावसाने हुलकावणी दिल्याने मृग नक्षत्र कोरडा जाण्याची भीती आहे़ आणखी एक आठवडाभर पावसाचे आगमन होणार नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे़ त्यामुळे यंदा पेरण्या लांबण्याची शक्यता आहे़ वेळेवर पाऊस न झाल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे़ निसर्गाचे संकट समोर असतानाच यंदा खताच्या किमतीतही वाढ झाली आहे़ त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे़ शासनाने रासायनिक खताचे दर जाहीर केले असून खताच्या किमतीत वाढ करून मागील वर्षीपेक्षा १० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे़ त्यामुळे चांगल्या प्रतीचा खत घेणे शेतकºयांना अशक्य होणार आहे़ मागील वर्षी पोटॅश खताचा भाव ७०० रूपये होता़ यावर्षी ९५० रूपये भाव आहे़ २०:२०:१३ या खताचा भाव १ हजार १०० रूपये झाला असून यामध्ये १७० रूपये वाढ झाली आहे़ डीएपी खताचा भाव गतवर्षी १ हजार २०० रूपये होता़ यावर्षी १ हजार ४७५ रूपये भाव आहे़ १०:२६:२६ खत १ हजार ३५० भाव असून मागील वर्षीपेक्षा त्यात २१० रूपयांनी वाढ झाली आहे़ १५:१५:१५ खताचा भाव १ हजार ५० रूपये असून मागील वर्षीपेक्षा १०० रूपये वाढले आहेत़ तर १२:३२:१६ खताचा १हजार ३७५ रूपये भाव असून गतवर्षीपेक्षा २०० रूपयांनी भाव वाढला आहे़
पुन्हा कर्जाचे दुष्टचक्ऱ़़
शेतक-यांना खरीप हंगामात अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यास पुन्हा कर्जाचे दुष्टचक्र सुरू होणार आहे़ पिकातून मिळणारे उत्पन्न कमीच येणार असल्याने शेतकरी आतापासूनच चिंतातूर झाला आहे़