मेहुणीसोबत प्रेमसंबंध खटकले, दाजीने तिच्या प्रियकराला यमसदनी पाठवले
By श्रीनिवास भोसले | Updated: July 18, 2023 19:29 IST2023-07-18T19:28:23+5:302023-07-18T19:29:01+5:30
मित्राच्या मदतीने मेहुणीच्या प्रियकराचा केला खून

मेहुणीसोबत प्रेमसंबंध खटकले, दाजीने तिच्या प्रियकराला यमसदनी पाठवले
नांदेड- बायकोच्या बहिणीसोबत असलेले युवकाचे प्रेमसंबंध खटकल्याने तरुणीच्या दाजीनेच तिच्या प्रियकराचा धारधार शस्त्राने खून केला. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. मयताचे नाव किरण माने असून, याप्रकरणी इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.
नांदेड शहरातील इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या शिवा माने यांच्याकडे त्याच्या बायकोची बहीणही राहते. या तरुणीचे शिवा माने याच्याच भावकीतील किरण नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. ही बाब शिवाला खटकत होती. त्यांनी अनेकवेळा किरण आणि त्याच्या मेहुणीला एकमेकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. समजावूनही सांगितले.
परंतु, त्यांनी थांबायला तयार नव्हते. हा राग मनात धरून शिवाने मित्राच्या मदतीने मेहुणीच्या प्रियकराचा काटाच काढला. धारधार शस्त्राने किरण माने याच्यावर हल्ला करण्यात आला. त्यात तो रक्तबंबाळ होऊन रस्त्यावर पडला. रक्तस्राव अधिक झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी संशयितांची चौकशी सुरू केली आहे. मुख्य आरोपी शिवा माने याच्यासह अन्य तिघांच्या शोधात पोलिस लागले आहेत. याप्रकरणी इतवारा ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
मयत तरुण आरोपीच्या भावकीतील
मेहुणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाचा राग मनात ठेवून ज्या युवकाचा शिवा माने याने खून केला, सदर मयत हा त्याच्याच भावकीतील असल्याचे समजते. त्याचबरोबर हे सर्वजण एकमेकांचे नातेवाईकही असल्याची माहिती पुढे येत आहे.