...तर एमआयएम महाराष्ट्रात एकही जागा लढवणार नाही-ओवेसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 19:26 IST2019-01-17T19:23:40+5:302019-01-17T19:26:03+5:30
एकही जागा न घेता आघाडीच्या मंचावर न येता स्वतंत्रपणे वंचित आघाडीचा प्रचार करु.

...तर एमआयएम महाराष्ट्रात एकही जागा लढवणार नाही-ओवेसी
नांदेड : एमआयएमला सोडून प्रकाश आंबेडकरांनीकाँग्रेससोबत यावे असे आवाहन काँग्रेस वारंवार करीत आहे. आज मी काँग्रेसला जाहीर ऑफर देत आहे. अॅड. आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील कार्य, कर्तृत्व, त्याग आणि ताकदीचा त्यांनी योग्य तो सन्मान ठेवावा. तसे केल्यास एमआयएम महाराष्ट्रात एकही जागा लढणार नाही. आता काय तो निर्णय काँग्रेसने घ्यावा, असे जाहीर आव्हान एमआयएमचे प्रमुख खा. असुदोद्दीन ओवेसी यांनी दिले.
येथील नवामोंढा मैदानावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित सत्ता संपादन महासभेत ते बोलत होते. या सभेत खा. ओवेसी यांच्यासह प्रकाश आंबेडकर यांनी सेना-भाजपासह काँग्रेसवरही घणाघाती टीका केली. मंचावर आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर, आ. इम्तीयाज जलील, माजी आ. हरिभाऊ भदे, प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे, महासचिव अमित भुईगळ, अॅड. शिवानंद हैबतपुरे, प्रा. डॉ. यशपाल भिंगे, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष फिरोजलाला आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या सभेत बोलताना एमआयएमचे नेते खा. ओवेसी म्हणाले, मी लालदिव्याच्या आशेने महाराष्ट्रात आलेलो नाही. देशातील वंचित, कष्टकरी समाजाला न्याय मिळावा, हीच माझी भूमिका आहे. काँग्रेस वंचितांसाठी लढणाऱ्या प्रकाश आंबेडकरांचा सन्मान ठेवणार असेल तर त्याचे एमआयएमच्या वतीने स्वागतच करु. आमची लढाई नरेंद्र मोदी, आरएसएस, शिवसेना अशा जातीयवादी पक्षांसोबत असल्याचे सांगत आता काँग्रेसने निर्णय घेण्याची वेळ आल्याचे खा. ओवेसी यावेळी म्हणाले.
तर एमआयएम बाजूला होईल
मनुवादी शक्तींना रोखण्यासाठी होत असलेल्या आघाडीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला समाविष्ट करुन घेण्यास एमआयएमची अडचण होत आहे. एमआयएमला बाजूला करुन अॅड. आंबेडकरांना जर आघाडीत सन्माजनक स्थान मिळत असेल तर आपण बाजूला होऊ. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुस्लिमावर मोठे उपकार आहेत. ते फेडण्यासाठी आपण एकही जागा न घेता आघाडीच्या मंचावर न येता स्वतंत्रपणे वंचित आघाडीचा प्रचार करु, असे ते म्हणाले.