नांदेडमध्ये हिट अँड रनचा थरार, दारूच्या नशेत चालकाने सहा वाहनांना उडवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 15:22 IST2025-07-29T15:21:19+5:302025-07-29T15:22:00+5:30
अपघातानंतर चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी वेळीच त्याला पकडून चांगलाच चोप दिला

नांदेडमध्ये हिट अँड रनचा थरार, दारूच्या नशेत चालकाने सहा वाहनांना उडवले
- सचिन मोहिते
नांदेड – भाग्यनगर चौरस्ता येथे मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. यशवंत कॉलेजच्या दिशेने भरधाव येणाऱ्या आलिशान कारने (गाडी क्रमांक MH22 AM 5) मुख्य रस्त्यावर येणाऱ्या तीन ऑटो, एक स्कुटी, एक बुलेट, एक फोर व्हीलर आणि पायी चालणाऱ्या महिला यांना जबर धडक दिली.
चालकाचा ताबा सुटलेली भरधाव कार काही अंतरावरील चौकातील विजेच्या खांबावर आदळली आणि थांबली. अपघातानंतर चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी वेळीच त्याला पकडले आणि दारूच्या नशेत असल्याचे लक्षात आल्यानंतर संतप्त जमावाने त्याला बेदम चोप दिला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन चालकाला ताब्यात घेतले आहे.
या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाल्याची शक्यता असून, त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. परिसरातील ट्युशन क्लासेस व शाळा लक्षात घेता मोठा अनर्थ टळल्याचे नागरिक सांगत आहेत.
अपघात घडल्यामुळे काही काळ भाग्यनगर चौरस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती. काही वेळ पोलिस प्रशासनालाही वाहतूक सुरळीत करण्यात अडचणी आल्या.