Heavy rains hit 1490 villages in Nanded district | नांदेड जिल्ह्यात १४९० गावांना अतिवृष्टीचा फटका
नांदेड जिल्ह्यात १४९० गावांना अतिवृष्टीचा फटका

ठळक मुद्देआतापर्यंत १०७ मि़मी़पाऊस४० ते ४५ टक्के पंचनामे पूर्ण 

- अनुराग पोवळे

नांदेड : जिल्ह्यात १८ आॅक्टोबरपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे १४९० गावांतील ४ लाख ११ हजार ३७५ हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली आहेत़ यात सर्वाधिक फटका हा सोयाबीन पिकाला बसला असून सोयाबीनचे ७० ते ८० टक्के नुकसान झाले असून त्या खालोखाल ज्वारीचे ५० ते ६० टक्के नुकसान झाले आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ३०़७८ मि़मी़ पाऊस बरसला आहे़ ही टक्केवारी १०७़८७ इतकी झाली आहे़ चार वर्षानंतर पावसाने सरासरी ओलांडली आहे़

जिल्ह्यात अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका कंधार तालुक्याला बसला असून ४९ हजार ८३४ हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली असून येथे ६४ हजार ८७२ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे़ त्या खालोखाल लोहा तालुक्यात खरीप पिकांचे नुकसान झाले असून ४८ हजार ८०० हेक्टर क्षेत्रात ६२ हजार ३५१ शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली आहेत़ नायगाव तालुक्यात ४३ हजार ४५० हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांचे नुकसान झाले असून त्यात २७ हजार ९४० हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पीक पाण्याखाली गेले आहे़ नांदेड तालुक्यात १८ हजार ९७६, अर्धापूर तालुक्यात १४ हजार ६८५, मुदखेड तालुक्यात १० हजार १४, देगलूर तालुक्यात २२ हजार ४३०, मुखेड तालुक्यात २१ हजार १३५, बिलोली तालुक्यात १९ हजार ४२०, धर्माबाद तालुक्यात २१ हजार ५५०, किनवट तालुक्यात २ हजार ६८९, माहूर तालुक्यात १२ हजार १२०, हिमायतनगर तालुक्यात १८ हजार ३७०, हदगाव तालुक्यात ३४ हजार ३४१, भोकर तालुक्यात ३९ हजार हेक्टर क्षेत्रात आणि उमरी तालुक्यात ३४ हजार ३६१ हेक्टर क्षेत्रातील पिके अतिवृष्टीने बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा कृषी विभागाने काढला असून हा अहवाल शासनाला पाठवण्यात आला आहे़ 

जिल्ह्यात सोयाबीनची ३ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती़ त्यातील २ लाख ४१ हजार ४९८ हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे़ तब्बल ७० ते ८० टक्के सोयाबीन वाया गेले आहे़ जिल्ह्यात ज्वारीचे जवळपास ५० ते ६० टक्के नुकसान झाले असून ३५ हजार ६०० हेक्टर क्षेत्राची ज्वारीची पेरणी झाली होती़ त्यात २२ हजार १२४ हेक्टर क्षेत्रातील ज्वारी पूर्णत: काळी पडली आहे़ नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाचीही बोंडे खराब झाले असून कापसाचे ३५ ते ४० टक्के नुकसान झाले आहे़ जिल्ह्यातील १ लाख १७ हजार १९८ हेक्टर क्षेत्रातील कापूस पिकाला अतिवृष्टीचा फटका बसला आहे़ 

४ वर्षानंतर पावसाने सरासरी ओलांडली आहे़ ९५५़५५ मि़मी़ वार्षिक सरासरी पाऊस जिल्ह्यात होतो़ यंदा तो १०३०़७८ मि़मी़ इतका झाला आहे़ जिल्ह्यातील १६ पैकी १२ तालुक्यांनी पावसाची सरासरी ओलांडली आहे़ मुदखेड तालुक्यात तब्बल दीडशे टक्के पाऊस झाला आहे़ कंधार तालुक्यात १३२़५९ टक्के, लोहा तालुक्यात १२९़०२ टक्के, नांदेड तालुक्यात १२२़२३ टक्के, अर्धापूर १०३़५०, भोकर १०३़४९, उमरी १००़३४, देगलूर १०३़७४, बिलोली १०८़९१, धर्माबाद ११७़०१, नायगाव ११५़६० टक्के आणि मुखेड तालुक्यात १२२़२० टक्के पाऊस झाला आहे़ जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस होणारे तालुके म्हणून ओळख असणाऱ्या किनवट-माहूर तालुक्यात मात्र यंदा पावसाने सरासरी गाठली नाही़ किनवट तालुक्यात ८०़८१ टक्के तर माहूर तालुक्यात ८४़६८ टक्के पाऊस झाला आहे़ हदगाव तालुक्यात ८४़३ आणि हिमायतनगर तालुक्यात ९६़२२ टक्के पाऊस बरसला आहे़ गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच यंदा दिवाळीत पावसाने जोरदार बॅटींग केली़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले़ 

पाच दिवसांत पंचनामे
अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकाचे पंचनामे कृषी व महसूल विभागाकडून संयुक्तपणे केले जात आहे़ आजघडीला जवळपास ४० टक्के नुकसानीचे पंचनामे करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी दिली़  पालकमंत्री रामदास कदम यांनी रविवारी केलेल्या पाहणीत पंचनाम्याचे काम पाच दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

Web Title: Heavy rains hit 1490 villages in Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.