अतिवृष्टीने पीक गेलं, डोकावरचे कर्ज कसे फिटेल; विवंचनेत शेतकऱ्याने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 19:40 IST2025-09-22T19:39:15+5:302025-09-22T19:40:06+5:30
या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

अतिवृष्टीने पीक गेलं, डोकावरचे कर्ज कसे फिटेल; विवंचनेत शेतकऱ्याने संपवले जीवन
- गोविंद टेकाळे
अर्धापूर (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील धामदरी येथील ३५ वर्षिय शेतकऱ्याने अतिवृष्टीने पिके वाहून गेल्याने उत्पन्न काहीच नाही मिळणार, आता कर्जकडे फेडायचे या विवंचनेत कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान दि.२२ सप्टेंबर सोमवार रोजी या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अर्धापूर तालुक्यातील धामदरी येथील तरूण शेतकरी तातेराव भीमराव कदम वय ३५ वर्ष असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तातेराव कदम हे मागील काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होते. या वर्षी सुद्धा त्यांच्या दोन हेक्टर शेतात अतिवृष्टीने पीक वाहून गेल्याने काहीच उत्पन्न हाती येणार नाही. त्याचबरोबर त्यांनी बॅंकेकडून कर्ज घेतले होते. या कर्जाचा डोंगर वाढत होता. यातच मुलांच्या शिक्षणाच्या खर्च, घराचा उदरनिर्वाह कसा करायचा या विचारात ते असत. नापिकी आणि कर्ज यामुळे तातेराव पूर्णतः खचले होते. यातच रविवारी रात्री त्यांनी आपल्या राहत्या घरी छताच्या लोखंडी कडीला दस्तीने गळफास लावून आत्महत्या केली.
या प्रकरणी साहेब कदम यांच्या माहितीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. सोमवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पप्पू चव्हाण करीत आहेत.