मुदखेडमधून घेतलेला गुटखा अर्धापुरातील एका घरात साठवला; दोघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 18:24 IST2025-01-24T18:23:35+5:302025-01-24T18:24:31+5:30
पोलिसांनी ३ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल केला जप्त

मुदखेडमधून घेतलेला गुटखा अर्धापुरातील एका घरात साठवला; दोघांवर गुन्हा
- गोविंद टेकाळे
अर्धापूर (नांदेड): मुदखेड तालुक्यातून विक्री केलेला गुटखा अर्धापूर तालुक्यातील एका जणाच्या घरी सापडला. यात ३ लाख ६७ हजार ९२६ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून सदर प्रकरणी दोघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र शासनाकडून प्रतिबंधित असलेला व छुप्या मार्गाने विक्री होत असणारा गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा तालुक्यातील गणपूर परिसरात असल्याची माहिती गुप्त खबरीमार्फत पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनी महेश कोरे, विजय आडे, गोणारकर, महेंद्र डांगे, अखिल बेग या पथकाने दि.२३ रोजी तालुक्यातील गणपूर परिसरात सायंकाळी ५ वाजता एका घराची झडती घेतली. यावेळी स्वयंपाक खोलीच्या पाठीमागे असलेल्या एका खोलीमध्ये प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा पोलिसांच्या हाती लागला. सदर मुद्देमाल हा बारड येथून खरेदी केल्याचे आरोपींने सांगितले. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात नवनाथ दिगंबर गादेवार ( ५१ रा. गणपूर ता. अर्धापूर) व साईनाथ बने ( रा. बारड ता. मुदखेड ) या दोघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनी महेश कोरे हे करीत आहेत.
गुटखा तस्करीतील बडे मासे हाताला लागणार का?
गुटखाबंदीला हरताळ फासणारे वर्षानुवर्ष हाच व्यवसाय करतात. परिसरात येणारा गुटखा परराज्यातुन येतो. तर जिल्यासह मुदखेड, अर्धापूर शहरातील मोठे मासे तसेच स्थानिक पातळीवर विविध कंपनीचा पान मसाला जर्दाची उत्पादने बेकायदेशीरपणे निर्मिती करणारांवर अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई होणार का? अशी कुजबुज सामान्य नागरिकांमधुन येते आहे.