गुजरातच्या व्यापाऱ्याचे दोन कोटी लातुरात लुटले, छोटा राजन टोळीतील शुटर राजेश खन्नाला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 19:21 IST2025-07-26T19:20:39+5:302025-07-26T19:21:32+5:30
लातूर जिल्ह्यातील किनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांना लुटल्याची घटना घडली होती

गुजरातच्या व्यापाऱ्याचे दोन कोटी लातुरात लुटले, छोटा राजन टोळीतील शुटर राजेश खन्नाला बेड्या
नांदेड : लातूर जिल्ह्यातील किनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांना एका टोळीने मारहाण करून लुबाडले हाेते. ही घटना २६ जून रोजी घडली होती. यावेळी दरोडेखोरांनी १ कोटी ८० लाख रुपयांची रक्कम लंपास केली होती. या प्रकरणात शिवा शेट्टी याला मुंबईतून अटक केली होती. त्यानंतर नांदेड एलसीबी आणि लातूर एलसीबीच्या पथकाने छोटा राजन टोळीतील शूटर संतोष नायक ऊर्फ राजेश खन्ना याला नालासोपारा येथून अटक केली आहे. त्याला पुढील तपासासाठी किनगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
किरीट सोमाभाई पटेल (रा. कमालपूर, ता. वडनगर, गुजरात) असे व्यापाऱ्यांचे नाव आहे. ते आपल्या एका साथीदारासह नांदेडात वसुलीसाठी आले होते. वसुली केलेले १ कोटी ८० लाख रुपये घेऊन अहमदपूरच्या पुढे काही अंतरावर रात्री १० वाजेच्या सुमारास त्यांच्या कारच्या समोर आणि मागे अशा दोन कार येऊन थांबल्या होत्या. त्यातून उतरलेल्या सहाजणांनी किरीट पटेल आणि त्यांच्या साथीदारांना टॉवेलने बांधले. त्यानंतर त्यांची कार काही अंतरावर नेऊन त्यातील रक्कम काढून पळ काढला होता. या प्रकरणात किनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणात नांदेड एलसीबीचे पोलिस उपनिरीक्षक आनंद बिचेवार आणि लातूरचे पथक तपास करीत होते. या पथकाने अगोदर शिवा शेट्टी कुख्यात गुन्हेगाराला अटक केली होती. त्यानंतर आता छोटा राजन टोळीतील शूटर असलेल्या संतोष नायक ऊर्फ राजेश खन्ना याला बेड्या ठोकल्या आहेत. नायक हा नालासोपारा येथे राहत होता.
छोटा राजन टोळीत होता शूटर
संतोष नायक ऊर्फ राजेश खन्ना हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर खुनासह लुटीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. छोटा राजनच्या टोळीत तो शूटर होता. नंतर शिवा शेट्टी यासह इतर कुख्यात गुन्हेगारांच्या टोळीत सहभागी होऊन त्याने मोठ्या रकमेची वाहतूक करीत असलेल्या व्यापाऱ्यांना टार्गेट करणे सुरू केले होते.