चारचाकी वाहन लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:17 AM2021-03-08T04:17:50+5:302021-03-08T04:17:50+5:30

महसूल पथकाची कारवाई लोहा : तालुक्यातील कौडगाव येथील चार तराफे पकडून ते जाळून टाकण्यात आले. तसेच अवैध उपसा केलेली ...

Four-wheeler lampas | चारचाकी वाहन लंपास

चारचाकी वाहन लंपास

Next

महसूल पथकाची कारवाई

लोहा : तालुक्यातील कौडगाव येथील चार तराफे पकडून ते जाळून टाकण्यात आले. तसेच अवैध उपसा केलेली ४५ ब्रास वाळूचा लिलाव महसूल प्रशासनाने केला. या कारवाईत नायब तहसीलदार राम बोरगावकर, तलाठी मनोज जाधव, संदीप कल्याणकर, सतीश शिंदे, सरोदे, कावळे, मांडवगडे, कोतवाल, विठ्ठल ढेपे, जोंधळे आदींचा समावेश होता.

सिमेंट रस्त्याला तडे

हदगाव : नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या चार वर्षापासून सुरू आहे. या रस्त्याला जागोजागी तडे गेल्याने या कामाचा दर्जा व्यवस्थित झाला नसल्याची तक्रार लोकांनी केली आहे. कामाचा दर्जा खालावलेला असताना याकडे प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही. तडे गेलेल्या ठिकाणी केवळ मल्लमपट्टी करण्याचा प्रयत्न संबंधितांकडून केला जात आहे.

पत्रकार कार्यकारिणी

फुलवळ : मराठी पत्रकार संघाची फुलवळ कार्यकारिणी निवडण्यात आली. कार्यकारिणी अशी- अध्यक्ष परमेश्वर डांगे, सचिव दिगंबर डांगे, सल्लागार डॉ. प्रदीपसिंह राजपूत, सदस्य धोंडिबा बोरगावे, मधुकर डांगे, विश्वंभर बसवंते, सचिन मंगनाळे, ॲड. उमर शेख.

ज्याेती वंजे यांचा गौरव

बहाद्दरपुरा : येथील रहिवासी ज्योती राजेश वंजे यांना पुणे येथील आयोजित बॉलीवूड मेकअप आर्टिस्ट स्पर्धेत बेस्ट मेकअप आर्टिस्ट पारितोषिक देण्यात आले. पुणे येथे या स्पर्धा घेण्यात आल्या. याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

विवाहितेचा छळ

भोकर : तालुक्यातील आंबुलगा येथील २२ वर्षीय विवाहितेचा माहेराहून २ लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून भोकर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

देगलुरातून मोबाईल लंपास

देगलूर : शहरातील शिवनेरी नगर येथील संतोष नाईकवाडे यांचा मोबाईल ५ मार्च रोजी चोरीला गेला. त्यांनी हा मोबाईल खुर्चीवर ठेवला होता. नजर चुकवून तो लंपास करण्यात आला. मोबाईलची किंमत २७ हजार रुपये होती. देगलूर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.

जुगार अड्ड्यावर छापा

किनवट : घोडीफाटा येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर किनवट पोलिसांनी ५ मार्च रोजी धाड टाकली. यात २ हजार ६० रुपये जप्त करून एकास ताब्यात घेण्यात आले. या घटनेची नोंद पोलिसात झाली आहे.

गजानन महाराज प्रकट दिन

किनवट : येथील गजानन महाराज संस्थानमध्ये श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कोरोनामुळे यावर्षी सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. फक्त महाप्रसादाचे पाकीट वाटप करण्यात आले. मंदिरातही सुरक्षित अंतर ठेवून भाविकांना दर्शन देण्यात आले.

न्यायालयीन कोठडीत रवानगी

नायगाव : तालुक्यातील देगाव येथील अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडछाड करणाऱ्या आरोपी शिक्षकाची आता पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. सपोनि के.एस. पठाण यांनी ही माहिती दिली. १ मार्च रोजी ही घटना घडली. बीट जमादार बारी यांनी गुन्हा नोंदवला होता. सुरुवातीला दोन दिवस पोलीस कोठडी मिळाली होती.

विवाहितेचा छळ

उमरी : मुलबाळ होत नसल्याने विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या सासरच्या पाच जणांविरुद्ध उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपी हे मुलबाळ होत नसल्याने रुग्णालयात उपचार करण्यासाठी माहेराहून ५० हजार रुपये घेऊन ये असे म्हणून विवाहितेचा छळ करीत होते.

दत्त मंदिरात महाआरती

नांदेड : येथील नल्लागुट्टा चाळमधील दत्त मंदिरात महाआरती व भंडारा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून परशुराम कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस अनिरुद्ध शिरसाळकर, पोलीस कर्मचारी राठोड, नितीन जैन, पांडे, डॉ. तम्मेवार आदी उपस्थित होते. यावेळी मंदिर व्यवस्थापनाकडून सर्वांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अभिजित पाटील, संजय टीके, गणेश अण्णा, दिलीप गोटींगलल्ला, अशोक विना आदी उपस्थित होते.

Web Title: Four-wheeler lampas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.