शाळेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात फटाके फोडले; छतावरील टाकाऊ फर्निचरला लागली आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 19:02 IST2025-06-07T19:01:35+5:302025-06-07T19:02:05+5:30
स्नेह संमेलनाचा कार्यक्रम सुरू असताना काहींनी फटाके फोडले.

शाळेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात फटाके फोडले; छतावरील टाकाऊ फर्निचरला लागली आग
नांदेड : शहरातील वर्दळीचा भाग असलेल्या कैलासनगर भागातील प्रतिभा निकेतन शाळेच्या इमारतीवरील छतावर असलेल्या टाकाऊ फर्निचरला शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत टाकाऊ फर्निचर जळून खाक झाले आहे.
प्रतिभा निकेतन शाळेमध्ये दोन दिवसीय रौप्य महोत्सव शालेय स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी हा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम सुरू असताना कार्यक्रमा दरम्यान काहींनी फटाके फोडले. त्यापैकी एक फटाका इमारतीवर असलेल्या टाकाऊ फर्निचरवर जाऊन पडला. त्यामुळे फर्निचरला आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.
या घटनेनंतर तात्काळ महानगरपालिकेच्या अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. काही वेळातच अग्नीशमन दलाच्या दोन अग्नीबंबांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीच्या घटनेनंतर परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती. या घटनेत कुठलीही जिवीत हानी झाली नाही.