गुटखा माफियांविरोधात गुटख्याच्या वेशात लढा, देगलूरमध्ये अनोखे आंदोलन चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 16:35 IST2025-07-28T16:26:13+5:302025-07-28T16:35:02+5:30
देगलूरमध्ये संपूर्ण गुटखाबंदीच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्याचे अनोखे आंदोलन

गुटखा माफियांविरोधात गुटख्याच्या वेशात लढा, देगलूरमध्ये अनोखे आंदोलन चर्चेत
- शेख शब्बीर
देगलूर (जि. नांदेड) : शासनाने बंदी घातलेला गुटखा तालुक्यात खुलेआम विकला जात असल्याचा आरोप करत निपाणी सावरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आकाश दत्ता पाटील कोकणे यांनी 28 जुलैपासून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुटख्याचा ड्रेस घालून उपोषण सुरू केले आहे.
राज्य शासनाने गुटख्याच्या उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वाहतुकीवर बंदी घालूनही देगलूर तालुक्यात पान टपऱ्या, हॉटेल्स व किराणा दुकांनांत गुटख्याची विक्री बिनधास्त सुरू आहे. संबंधित यंत्रणा व काही भ्रष्ट अधिकारी गुटखा माफियांशी हातमिळवणी करून कारवाई टाळत असल्याचा आरोप कोकणे यांनी केला आहे.
या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, अन्न व औषध प्रशासन आणि उपजिल्हाधिकारी यांना वेळोवेळी निवेदनाद्वारे माहिती दिली होती. मात्र कारवाई न झाल्याने त्यांनी निपाणी सावरगाव येथून 14 किमी अंतर पायी चालत येत देगलूर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात त्यांनी गुटख्याचे विविध ब्रँड दाखवणारा खास ड्रेस परिधान केला असून, त्यांच्या वेशभूषेची शहरात मोठी चर्चा आहे. नागरिकांचेही या अनोख्या आंदोलनाकडे लक्ष वेधले जात आहे.