मुलीच्या लग्नाच्या चिंतेने पित्याने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 14:30 IST2019-02-04T14:29:06+5:302019-02-04T14:30:12+5:30
दोन मुलींच्या लग्नासाठी काढलेले कर्ज फिटले नसताना तिसऱ्या मुलीचे लग्न कसे करणार

मुलीच्या लग्नाच्या चिंतेने पित्याने घेतला गळफास
नांदेड : दोन मुलींच्या लग्नासाठी काढलेले कर्ज फिटले नसताना तिसऱ्या मुलीचे लग्न कसे करणार या चिंतेत असलेल्या चांदबा सूर्यभान ढवळे (५५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली़ ही घटना १ फेब्रुवारी रोजी शहरातील ओंकारेश्वरनगर येथे घडली़
ढवळे यांना तीन मुली आहेत़ यातील दोन मुलींचे लग्न त्यांनी उसनवारी करून केले होते़ या मुलींच्या लग्नात घेतलेले कर्जच अजून फिटले नव्हते़ त्यात तिसरी मुलगीही लग्नाला आली होती़ त्यामुळे पैसे नसताना तिसऱ्या मुलीचे लग्न कसे करायचे, या चिंतेत ते गेल्या काही दिवसांपासून होते़ त्यातच घराजवळ असलेल्या एका बांधकामाच्या शेडमध्ये १ फेब्रुवारी रोजी त्यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली़ याप्रकरणी मुलगा सूर्यकांत चांदबा ढवळे यांच्या माहितीवरून भाग्यनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे़ या प्रकरणाचा तपास पोहेकॉ़ एस़डी़ शिरसाटे हे करीत आहेत़