नोकरीसाठी अडचण येणार म्हणून बापाने मुलीला विकले; आईच्या तक्रारीवरुन दाेघांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 17:25 IST2025-07-22T17:23:57+5:302025-07-22T17:25:13+5:30
भाग्यनगर पोलिस ठाण्यात पती आणि मुलीला विकत घेणाऱ्या अशा दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नोकरीसाठी अडचण येणार म्हणून बापाने मुलीला विकले; आईच्या तक्रारीवरुन दाेघांविरुद्ध गुन्हा
नांदेड : वडिलांचे निधन झाल्यानंतर अनुकंपा तत्वावर शिपाई पदाच्या नोकरीसाठी तीन अपत्याची अट अडचण ठरणार म्हणून पित्याने चक्क पोटच्या मुलीलाच एक लाख रुपयात विक्री केले. ही घटना २०१८ मध्ये घडली. पत्नीपासून वेगळे राहत असलेल्या महिलेला ही बाब सहा वर्षांनी समजल्यानंतर त्यांनी एनजीओच्या मदतीने चौकशी केली. त्यानंतर या प्रकरणात भाग्यनगर पोलिस ठाण्यात पती आणि मुलीला विकत घेणाऱ्या अशा दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सुरेखा या महिलेचे २००९ मध्ये गजानन विनायकराव वांजरखेडे यांच्यासोबत विवाह झाला होता. त्यांना मुलगा आणि दोन जुळ्या मुली झाल्या. २०१८ मध्ये गजानन वांजरखेडे याने पत्नी सुरेखा यांना विष्णुपुरी येथील नातेवाईक देवीदास जोशी यांना मुलबाळ नसल्याने एक मुलगी विकत देऊया असे सांगितले. परंतु सुरेखा यांनी त्याला विरोध केला. त्यावरून दोघांमध्ये वादानंतर गजानन वांजरखेडे याने पत्नी सुरेखा यांना घरातून हाकलून दिले. अन् मुलगा आणि दोन्ही मुलींना आपल्याजवळ ठेवले. तेव्हापासून सुरेखा या नातेवाइकांकडे राहतात. त्यात २०२३ मध्ये गजानन वांजरखेडे याला अनुकंपा तत्वावर दुय्यम निबंधक कार्यालय हिंगोली येथे शिपाई पदावर नोकरी लागली. काही दिवसानंतर सुरेखा यांना दीर श्याम वांजरखेडे यांनी भेटून तुमच्या मुलीला २०१८ मध्येच देवीदास जोशी यांना विक्री केल्याचे सांगितले. सुरेखा यांनी जोशी यांचे घर गाठून चौकशी केली. त्यावेळी मुलीच्या वडिलांनीच मुलीला विक्री केल्याचे जोशी यांनी सांगितले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सुरेखा यांनी थेट भाग्यनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पती गजानन वांजरखेडे आणि देवीदास जोशी या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शाळेतील दाखल्यावर दुसरेच नाव
सुरेखा यांनी एनजीओच्या माध्यमातून मुलगी शुभांगी ज्या शाळेत शिकत होती. तिथे जावून चौकशी केली असताना त्या ठिकाणी मुलीचे नाव दुर्गा आणि पित्याचे नाव देवीदास जोशी अशी नोंद होती. तर जन्म झालेल्या रुग्णालयात वडिलांच्या नावासमोर गजानन वांजरखेडे असा उल्लेख होता. ही सर्व कागदपत्रे जमा करून भाग्यनगरचे पोनि. संतोष तांबे यांच्याकडे दिली. त्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला अशी माहिती जनसंजीवनी एनजीओचे संचालक नवीन जाणकर यांनी दिली.
विक्री केलेली मुलगी बालकल्याण समितीकडे
अनुकंपा तत्त्वावरील नोकरीत अडचण ठरणार म्हणून पित्यानेच एका नातेवाइकाला आपली मुलगी एक लाख रुपयांत विक्री केल्याची घटना २०१८ मध्ये नांदेडात घडली होती. ही बाब सहा वर्षांनंतर उघडकीस आल्यानंतर मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पित्यासह मुलगी खरेदी करणाऱ्याच्या विरोधात भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. पोलिसांनी तत्काळ त्या मुलीचा ताबा घेऊन तिला बालकल्याण समितीकडे सुपूर्द केले आहे. तर दोघांपैकी एकाला नोटीस बजाविण्यात आली आहे, अशी माहिती पोनि संतोष तांबे यांनी दिली.
मुलीचा पिता प्रशिक्षणासाठी बाहेर
सुरेखा गजानन वांजरखेडे या महिलेला दोन मुली आणि एक मुलगा आहे. पती गजानन वांजरखेडे याच्या वडिलांचे निधन झाल्याने अनुकंपा तत्त्वावर त्याला हिंगोलीच्या महसूल विभाग दुय्यम निबंधक कार्यालयात शिपाई पदावर नोकरीची संधी होती. परंतु तीन अपत्य असल्याने नोकरीची संधी हिरावली जाणार, या भीतीने त्याने विष्णुपुरी भागातील देवीदास जोशी या नातेवाइकाला शुभांगी या मुलीची विक्री केली. तब्बल सहा वर्षांनंतर ही बाब मुलीची आई सुरेखा वांजरखेडे यांना समजली. एनजीओच्या मदतीने त्यांनी पुरावे गोळा करून भाग्यनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. भाग्यनगरचे पोनि संतोष तांबे यांनी ही या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पावले उचलली. देवीदास जोशी याला नोटीस देऊन मुलीला ताब्यात घेतले. नंतर या मुलीला बालकल्याण समितीकडे देण्यात आले. तर मुलीचा पिता गजानन वांजरखेडे हा प्रशिक्षणासाठी बाहेर जिल्ह्यात आहे. त्यामुळे त्यालाही लवकरच नोटीस देण्यात येणार आहे.