उमरीजवळ तरुण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 18:02 IST2020-03-02T17:59:57+5:302020-03-02T18:02:26+5:30
शेतात पाणी देण्यास गेला असता झाली घटना

उमरीजवळ तरुण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू
उमरी : तालुक्यातील मोखंडी येथे शेतात ऊसाला पाणी देत असताना विजेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. शिवाजी लक्ष्मण नव्हाते ( २१, रा.मोखंडी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शिवाजी नव्हाते हा एका मित्रासोबत शेतावर पाणी देण्यासाठी गेला होता. यावेळी सोबतचा मित्र आखाड्यावर झोपला तर शिवाजी हा पाणी देण्यासाठी शेतात गेला. दरम्यान, विजेच्या जिवंत तारेला स्पर्श होऊन शिवाजीचा जागीच मृत्यू झाला. रात्र असल्याने ही घटना कोणाच्या लक्षात आली नाही. मात्र सकाळी ही घटना उघडकीस आली. मृत शिवाजी याच्या पार्थिवावर मोखंडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवाजी एकुलता एक मुलगा होता. त्यांची मोखंडी गावाच्या शिवारात दीड एकर शेती आहे. आई-वडील ऊस तोड कामगार आहेत. नव्हाते कुटुंबावर अचानक कोसळलेल्या या दुःखद प्रसंगामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.