नांदेडात साडेचार हजार शेतकऱ्यांच्या नावाने भरला बोगस पीकविमा; ४० सेतू केंद्रचालकांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 17:13 IST2025-07-03T17:13:10+5:302025-07-03T17:13:36+5:30

बीड, परभणी, पुणे, लातूर, जालना व उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांची नावे बोगस पद्धतीने घुसविण्यात आली.

Fake crop insurance was paid in the name of 4,500 farmers in Nanded; 40 Setu center operators charged | नांदेडात साडेचार हजार शेतकऱ्यांच्या नावाने भरला बोगस पीकविमा; ४० सेतू केंद्रचालकांवर गुन्हा

नांदेडात साडेचार हजार शेतकऱ्यांच्या नावाने भरला बोगस पीकविमा; ४० सेतू केंद्रचालकांवर गुन्हा

नांदेड : प्रधानमंत्री पीकविमा योजनेत नांदेडमध्ये सेतू सुविधा केंद्रचालकांनी गत वर्षभरात तब्बल ४ हजार ४५३ शेतकऱ्यांच्या नावाने बोगस पीकविमा भरल्याचे उघडकीस आले आहे. पीक विम्याचे पैसे उकळण्यासाठी हा प्रकार करण्यात आला. या प्रकरणात कृषी विभागाच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात ४० सेतू सुविधा केंद्रचालकांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्यातही असाच घोटाळा उघडकीस आला होता. राज्यात प्रधानमंत्री पीकविमा योजनेत मोठ्या प्रमाणात बोगसपणा झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. ही योजना कृषी विभाग, महाराष्ट्र शासन व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येते. त्यामध्ये शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरताना सातबारा, स्वयंघोषणापत्र, पासबुक व शेती करार पद्धतीने करत असल्यास रजिस्ट्री ऑफिसचे करारपत्र बंधनकारक आहे.

या कागदपत्रांची छाननी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत केली जाते. त्यानुसार खरीप हंगाम २०२४ मध्ये कागदपत्रांची छाननी केली असता १ जुलै २०२४ पासून काही सामाईक सुविधा केंद्रचालकांकडून शासनाच्या मालकीच्या जमिनीवर, दुसऱ्या शेतकऱ्यांच्या, संस्थेच्या जमिनीवर भाडेकरार, संमतीपत्र नसताना नांदेड जिल्ह्यात एकूण ४ हजार ४५३ शेतकऱ्यांच्या जमिनीवर पीकविमा काढण्यात आला. तसेच बीड, परभणी, पुणे, लातूर, जालना व उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांची नावे बोगस पद्धतीने त्यात घुसविण्यात आली. याबाबत १३ फेब्रुवारी २०२५ रोजी इन्शुरन्स कंपनीने कृषी विभागाला कळविले होते. त्यानंतर जिल्हास्तरीय पीक आढावा बैठकीत अशा सुविधा केंद्रचालकांवर कारवाईचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी कृषी अधिकारी माधव चामे यांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून ४० सेतू सुविधा केंद्रचालकांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हे आहेत ते ४० सुविधा केंद्रचालक
संदीप उद्धवराव गुट्टे, लक्ष्मण दत्तात्रय ढवळे, सुशांत राजू भिसे, मोतीराम माधव आंधळे, अली उस्मान शेख, स्वप्निल सुनील उमरसादा, शिवशंकर ज्ञानोबा लांब, शरद अशोक नागरगोजे, नवनाथ मधुकर फड, धनराज ज्ञानोबा चिखलभिडे, नितीन दत्ता डोंगरे, धोंडिबा बलभीम पोटभिरे, दीपक अंताराम आंधळे, गोविंद हनमंत चवधरी, ब्रिजेश मिश्रा, जनार्दन सुदामराव दौंड, परमेश्वर विठ्ठलराव पावडे, विशाल बालाजी कदम, अमित तिवारी, अमोल ज्ञानोबा शेप, दत्ता दिलीप बोडके, मीरा गोविंद चाटे, संतोष राजाराम चिद्रेवार, वैभव पंढरीनाथ गुंगे, पवन नारायण नागरे, गोपाळ नारायण घुगे, दिनकर बालाजी नागरवाड, महेश दत्तात्रय गर्जे, मोहितकुमार परमेश्वर, नवनाथ वाघ, उमेश रामहरी मुंडे, शिंदे संभाजी हनमंतराव यांच्यासह इतर सात जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

Web Title: Fake crop insurance was paid in the name of 4,500 farmers in Nanded; 40 Setu center operators charged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.