बारावीला चार वेळा नापास पण तो हरला नाही; जिद्दी शेतकरी पुत्राचा MPSC मध्ये यशाचा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 11:38 IST2025-02-22T11:37:24+5:302025-02-22T11:38:24+5:30

बारावी परीक्षेत पेपर अवघड गेला, नापास झाले तर अनेक तरुण-तरुणी टोकाचा निर्णय घेतात त्यांच्यासाठी ही घटना प्रेरणा देणारी आहे.

Failed 12th four times but did not lose; Stubborn farmer's son Akash Shinde's flag of success in MPSC | बारावीला चार वेळा नापास पण तो हरला नाही; जिद्दी शेतकरी पुत्राचा MPSC मध्ये यशाचा झेंडा

बारावीला चार वेळा नापास पण तो हरला नाही; जिद्दी शेतकरी पुत्राचा MPSC मध्ये यशाचा झेंडा

- मारोती चिलपिपरे 
कंधार (नांदेड) :
अखंड मेहनत आणि जिद्दीने सगळं काही साध्य करता येतं असं म्हणतात. सातत्य पूर्ण मेहनत केली असता कोणतंही अपयश आलं तरी ते आपल्या स्वप्नांना पूर्ण होण्यापासून रोखू शकत नाही. अपयश आलं म्हणून हार मानून न जाता पुन्हा हिमतीने उभं राहून तो प्रवास करावा लागतो तेव्हाच यश हाती लागतं. आज आपण अशाच एका हरहुन्नरी तरुणाची प्रेरणादायी कथा जाणून घेणार आहोत, ज्याने बारावीमध्ये चार वेळा नापास होऊनसुद्धा हार न मानता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC)  परीक्षा उत्तीर्ण होऊन सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील गुंटूर येथील शेतकरी पुत्र आकाश सुरेश शिंदे हा बारावीला सलग चार वेळा नापास झाला. मात्र, हार न मानता तो परीक्षा देत राहिला. पाचव्या वेळेस त्याने बारावी उत्तीर्ण केली. मोठ्या कष्टाने बारावी पास झालेल्या आकाश आता आयुष्यात काहीतरी भव्यदिव्य करायचं यासाठी झपाटून गेला. अपयश पचवून यश मिळालेल्या आकाशने MPSC मार्फत सरकारी नोकरी मिळवायचा चंग बांधला. त्यासाठी आकाशने २०१७ पासून स्पर्धा परीक्षेचे तयारी सुरू केली. तसेच मुक्त विद्यापीठातून पदवीसाठी प्रवेश घेतला.

दरम्यान, २०१९ मध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आकाशची लढाई सुरू झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आकाशने दिवसरात्र एक केला. मागील अपयश विसरून झोकून देऊन अभ्यास करण्याचा सल्ला आई वडिलांनी देत मोठी हिंमत आकाशला दिली. दरम्यान, आकाश स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुणे गाठले येथेच त्याने जीव तोडून मेहनत केली. आखरे आकाशची जिद्द फळाला आली अन् त्याची एमपीएससी च्या माध्यमातून महसूल सहाय्यक पदी निवड झाली. आकाशने यश संपादन केल्यानंतर ही घटना न केवळ त्याच्या कुटुंबासाठी तर संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. बारावी परीक्षेत पेपर अवघड गेला, नापास झाले तर अनेक तरुण-तरुणी टोकाचा निर्णय घेतात त्यांच्यासाठी ही घटना प्रेरणा देणारी आहे.

गावात जल्लोषात स्वागत
प्रत्येकाची अनेक स्वप्न असतात. पण हि स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मेहनतीची जोड लागते. याच मेहनतीच्या जोरावर गुंटूर गावातील आकाश शिंदे याने एमपीएससीच्या परीक्षेत यश मिळवले आहे. या परिक्षेसाठी आकाशने अखंड मेहनत घेतली. स्वत:ला अनेक गोष्टींपासून लांब ठेवले. अखेर आकाशच्या पदरी यश पडले. सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करून गावी पोहोचताच आकाशचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. आई-वडिलांनी मुलाच्या यशाचा आनंद गावभर साजरा केला.

यशासाठी संयम हवा
दहावी-बारावीत एखादा गुण इकडे तिकडे झाला तरी मुलं थेट आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचताना दिसतात. पण दहावी-बारावी ही आयुष्याची अंतिम परीक्षा नव्हे. मी बारावीत एक नव्हे, चार वेळा सपशेल नापास झालो. पण जिद्द सोडली नाही त्यानंतर पाचव्या प्रयत्नातून बारावी पास झालो. २०१७ पासून स्पर्धा परीक्षेची तयारी केल्यानंतर आता यश मिळाले. तुम्ही हि स्वप्न पाहा. पण त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी मेहनतीची जोड द्या. त्यासोबत ते स्वप्न पुर्ण होण्याची वाट पाहण्यासाठी तुमच्याकडे तसाच संयम देखील हवा. दहावी-बारावीला नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता जिद्दीने मेहनत घेतली तर यश नक्की मिळेल.
- आकाश सुरेश शिंदे, गुंटूर

Web Title: Failed 12th four times but did not lose; Stubborn farmer's son Akash Shinde's flag of success in MPSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.