ईव्हीएम मशीन यंत्राचे सील टॅग आढळले लोह्यातील बालाजी मंदिर परिसरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 00:38 IST2018-12-18T00:37:02+5:302018-12-18T00:38:16+5:30
मागील आठवड्यात लोहा नगरपालिकेची निवडणूक पार पडली. भारतीय जनता पक्षाने काँग्रेस पक्षाचा दारून पराभव करत घवघवीत यश संपादन केले.

ईव्हीएम मशीन यंत्राचे सील टॅग आढळले लोह्यातील बालाजी मंदिर परिसरात
लोहा : मागील आठवड्यात लोहा नगरपालिकेची निवडणूक पार पडली. भारतीय जनता पक्षाने काँग्रेस पक्षाचा दारून पराभव करत घवघवीत यश संपादन केले. दरम्यान १७ डिसेंबर रोजी दुपारी ईव्हीएम मशीनयंत्राचे सील असलेल्या अॅड्रेस टॅग तहसील कार्यालयापासून एक किमी अंतरावर असलेल्या बालाजी मंदिर परिसरात रस्त्यालगत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
लोहा पालिकेसाठी ९ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली तर मतमोजणी १० रोजी करण्यात आली. दरम्यान, सोमवारी दुपारी बालाजी मंदिराच्या पाठीमागील बाजूस एका रस्त्यालगत मोकळ्या मैदानात ईव्हीएमचे सील असलेल्या चिठ्ठ्या (अॅड्रेस टॅग) आढळून आल्या. शहरातील काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सोनू संगेवार, नवनिर्वाचित नगरसेवक पंचशील कांबळे, नगरसेवक प्रतिनिधी जिवन पाटील चव्हाण, माजी नगरसेवक अनिल दाढेल, युवकचे पांडुरंग शेटे आदींनी भेट देऊन पाहणाी केली. तसेच लोहा पोलीस ठाण्याचे पोउपनि असद शेख, वसंत केंद्रे, भास्कर मुंडे यांच्यासह शहरातील अनेकांनी धाव घेतल्याने बालाजी मंदिर परिसरात बघ्यांनी गर्दी केली होती. यावेळी स्थानिक पोलिसांनी निवडणूक विभागाच्या आदेशाविना पंचनामा करणार नसल्याची भूमिका घेतली. न.प. निवडणुकी दरम्यान यासंदर्भात लवकरच न्यायालयात दाद मागू असे काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सोनु संगेवार यांनी सांगितले. यासंदर्भात लोह्याचे तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी विठ्ठल परळीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन स्वीकारला नाही. तर दुसरे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा न.प.चे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांचा मोबाईल बंद होता.