रेल्वे रुंदीकरण होऊन १९ वर्षे लोटली; आदिलाबाद-मुदखेड-नांदेड मार्गावर नवीन गाड्या वाढेनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 18:45 IST2025-02-11T18:42:30+5:302025-02-11T18:45:27+5:30

रेल्वे मार्गाचे रुंदीकरण होऊन १९ वर्षे लोटले तरी सद्यःस्थितीत तीन एक्स्प्रेस, तीन साप्ताहिक आणि चार पॅसेंजर इतक्याच गाड्यांची बोळवण करण्यात आली आहे.

Even after 19 years of railway widening, no new trains are being added on the Adilabad-Mudkhed-Nanded route | रेल्वे रुंदीकरण होऊन १९ वर्षे लोटली; आदिलाबाद-मुदखेड-नांदेड मार्गावर नवीन गाड्या वाढेनात

रेल्वे रुंदीकरण होऊन १९ वर्षे लोटली; आदिलाबाद-मुदखेड-नांदेड मार्गावर नवीन गाड्या वाढेनात

- गोकुळ भवरे
किनवट (जि. नांदेड) :
आदिलाबाद ते मुदखेड-नांदेड हा रेल्वे मार्ग दुर्लक्षित असून, या मार्गावर रेल्वे गाड्या वाढवण्यासाठी व रेल्वे स्टेशनची समस्या सोडवण्यासाठी हिंगोली, आदिलाबाद आणि नांदेडच्या खासदारांनी मोट बांधून लक्ष देण्याची मागणी केली आहे. रेल्वे मार्गाचे रुंदीकरण होऊन १९ वर्षे लोटले तरी सद्यःस्थितीत तीन एक्स्प्रेस, तीन साप्ताहिक आणि चार पॅसेंजर इतक्याच गाड्यांची बोळवण करण्यात आली आहे. देशाच्या मध्यभागी राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरसाठी नांदेड- मुदखेड- किनवट- आदिलाबाद मार्गावर एकही नियमित एक्स्प्रेस गाडी नसल्याने या मार्गावरील प्रवाशांची उपेक्षा कायम आहे.

नंदिग्राम एक्स्प्रेस नागपूरऐवजी बल्लारशाह येथून मुंबईकरिता धावत आहे. तिचा नागपूरपर्यंत विस्तार करावा, अशी मागणी होती. पण ती बल्लारशाह येथून सोडण्यात येत असल्याने नागपूरच्या मागणीकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केले. आदिलाबाद-मुदखेड नांदेड या मीटरगेज मार्गाचे ब्रॉडगेज करण्यासाठी १९७८ साली स्व. खा. उत्तमराव राठोड यांच्यामुळे मंजुरी मिळाली. मात्र, ब्रॉडगेज होण्यासाठी २८ वर्षे लागली. २००६ काम पूर्ण झाले आणि मार्ग सुरू झाला.

नांदेड-मुदखेड-किनवट आदिलाबादमार्गे नागपूर- दिल्लीकरिता एकही गाडी सुरू नाही. नांदेडवरून दिल्लीला गाड्या आहेत. त्या औरंगाबाद-मनमाडमार्गे धावतात. दिल्लीला जायचे झाल्यास किनवट, हिमायतनगर, हदगाव, भोकर, मुदखेड येथील प्रवाशांना नांदेडवरून जावे लागते. मंजूर गाड्याही हिंगोलीमार्गे वळवून या मार्गावर अन्याय करण्यात आला.

चार पॅसेंजर तर तीन साप्ताहिक गाड्या सुरू
ब्रॉडगेज झाल्याने मुंबई, नांदेड, नागपूर व नागपूर नांदेड मुंबई नंदिग्राम एक्स्प्रेस होती. ती आता बल्लारशाह-मुंबई अशी आहे. आदिलाबाद-तिरुपती, तिरुपती आदिलाबाद (कृष्णा एक्स्प्रेस) या दोन गाड्या तसेच तीच गाडी आदिलाबाद-नांदेड इंटरसिटी दोन फेऱ्या करत आहे. पूर्णा-परळी आदिलाबाद, आदिलाबाद पूर्णा परळी ह्या चार पॅसेंजर गाड्या सुरू आहेत. शिवाय पूर्णा-पटणा, धनबाद-दीक्षाभूमी एक्स्प्रेस, संत्रागच्ची या तीन साप्ताहिक गाड्या सुरू आहेत.

खासदारांची वज्रमूठ महत्त्वाची
काजीपेठ-ताडोबा एक्स्प्रेस ही साप्ताहिक गाडी बंद आहे. मधल्या काळात सुरू झालेली स्पेशल साप्ताहिक गाडी आता बंद आहे. या गाड्यांव्यतिरिक्त इतर एकही गाडी नव्याने सुरू करण्यात आली नसल्याने हिंगोली व आदिलाबादचे खासदार याकामी कमी पडले आहेत. आता नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी लक्ष घातले आणि तिघांची मोट बांधली गेली तर दमरेवर प्रभाव पडू शकतो आणि गाड्या वाढू शकतात, असे बोलले जात आहे. विद्युतीकरण झाले आता राहिले. दुहेरीकरण. नुकतेच राज्याला रेल्वेसाठी २३ हजार ७७८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातील नांदेड, मुदखेड, किनवट, आदिलाबाद मार्गासाठी किती, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

Web Title: Even after 19 years of railway widening, no new trains are being added on the Adilabad-Mudkhed-Nanded route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.