कृष्णूर धान्य घोटाळ्याप्रकरणी आरोपींची खाती गोठविण्याचे प्रयत्न; पोलिसांनी दहा बँकांना दिले पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 17:09 IST2018-09-20T17:08:23+5:302018-09-20T17:09:51+5:30
बहुचर्चित कृष्णूर शासकीय धान्य घोटाळ्यातील सात प्रमुख आरोपींचे बँक खाते गोठविण्याचे आदेश तपास अधिकाऱ्यांनी सर्व संबंधित बँकांना दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

कृष्णूर धान्य घोटाळ्याप्रकरणी आरोपींची खाती गोठविण्याचे प्रयत्न; पोलिसांनी दहा बँकांना दिले पत्र
बिलोली (नांदेड ) : बहुचर्चित कृष्णूर शासकीय धान्य घोटाळ्यातील सात प्रमुख आरोपींचे बँक खाते गोठविण्याचे आदेश तपास अधिकाऱ्यांनी सर्व संबंधित बँकांना दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, फरार आरोपींचा अजूनही शोध सुरू असून वेगवेगळे पोलीस पथक परराज्यात जाऊन आले आहे़
दोन महिन्यांपूर्वी १८ जुलै रोजी दहा ट्रक शासकीय गहू व तांदूळ काळ्या बाजारात जाताना पोलिसांनी पकडले होते. सदरील धान्य कृष्णूर एमआयडीसी परिसरातील इंडिया मेगा अनाज कंपनीमध्ये उतरवताना जप्त करण्यात आले. सदरील प्रकरणात जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार तसेच संगनमत केलेला गैरव्यवहारप्रकरणी वेगवेगळ्या आठ गुन्ह्याअंतर्गत अजामिनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणातील कारखाना व्यवस्थापक जयप्रकाश तापडिया व वाहतूक ठेकेदार राजू पारसेवार यांचा अटकपूर्व जामीन बिलोली सत्र न्यायालयाने यापूर्वीच फेटाळला आहे. आरोपींचा दोन महिन्यांपासून ठावठिकाणा लागत नसल्याने सात आरोपींची मालमत्ता जप्त करण्यासाठी आणि वॉरंट करीत नायगाव न्यायालयाकडे मागणी करण्यात आली आहे़ त्यावर येत्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे़
सदरील प्रकरणात बँक खात्यामार्फत मोठे व्यवहार झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले. कारखानामालक अजय बाहेती व ठेकेदार राजू पारसेवार यांच्या जप्त केलेल्या कागदपत्रे व लॅपटॉप, संगणकात मोठे व्यवहार झाल्याचे चौकशीत आढळले आहे, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. मुनीम, नोकर, ट्रकचालक यांच्या पोलीस झाडाझडतीतही मोठी माहिती समोर आली. त्यानुसार संबंधित मुख्य फरार आरोपी अजय बाहेती, राजू पारसेवार, जयप्रकाश तापडिया, कपिल पोकर्णा, विजय पोकर्णा, कपिल गुप्ता व श्रीनिवास दमकोंडावार या सात जणांची वेगवेगळ्या बँकेत खाती आहेत. जवळपास यामध्ये दहा बँकांचा समावेश असून सर्व सात आरोपींचे बँक व्यवहार गोठवण्याचे आदेशवजा पत्र पोलिसांनी बुधवारी बँकांना दिले आहेत.
ज्यामध्ये बँक आॅफ महाराष्ट्र, आंध्रा बँक, स्टेट बँक आॅफ इंडिया, शंकर नागरी सहकारी बँक, बँक आॅफ बडोदा आदी बँकांचा समावेश आहे. या घटनेतील सर्व संशयित आरोपींची आर्थिक माहिती नांदेडच्या आयकर आयुक्तांनाही दिली असून त्यांच्याकडूनही चौकशी सुरू झाली असल्याचे सांगण्यात आले.घटना गंभीर असल्याने तसेच आरोपी फरार असून न्यायालयाने जामीन नाकारल्याने तपास अधिकारी खाती गोठविण्याची कार्यवाही करू शकतात, असे अनुभवी ज्येष्ठ विधिज्ञांनी सांगितले.
हिंगोलीचा खुराणा मात्र नामानिराळाच
धान्य घोटाळा प्रकरणात हिंगोलीचे सात ट्रक हे त्यांच्या नियोजित मार्गापेक्षा उलट्या दिशेने प्रवास करीत असल्याचे पोलीस अहवालात नमूद आहे़ त्यानुसार हिंगोलीचा धान्य पुरवठादार खुराणा याच्यावर गुन्हाही नोंदविण्यात आला आहे़ परंतु, अद्यापही पोलिसांनी या प्रकरणात खुराणा याच्यावर कोणतीच कारवाई केली नाही़ तर दुसरीकडे नांदेडातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येत आहे़ त्यामुळे खुराणा या प्रकरणात सध्यातरी नामानिराळाच आहे़ हिंगोलीच्या सात गाड्या असताना या घोटाळ्याची झळ मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नाही़