घाबरू नका, सतर्क रहा! नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्याला भूकंपाचा सौम्य धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 19:21 IST2026-02-11T19:21:27+5:302026-02-11T19:21:48+5:30
मुखेडमध्ये भूगर्भातून आवाजासह हादरे! नागरिकांनी सतर्क राहावे, प्रशासनाचे आवाहन

घाबरू नका, सतर्क रहा! नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्याला भूकंपाचा सौम्य धक्का!
मुखेड (नांदेड): नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात बुधवारी (११ फेब्रुवारी) दुपारी ३:२५ च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूगर्भातून मोठा आवाज येऊन जमीन हादरल्याने हिब्बट, कोळगाव, धामणगाव, मोटरगा यांसह परिसरातील अनेक गावांमधील नागरिकांची एकच धावपळ उडाली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
खपराळ जवळ होता केंद्रबिंदू राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या नोंदीनुसार, दुपारी ३:२० वाजता या भूकंपाची नोंद झाली. रिश्टर स्केलवर याची तीव्रता ३.० इतकी मोजण्यात आली असून, याचा केंद्रबिंदू मुखेड तालुक्यातील खपराळ गावाजवळ होता. धक्के जाणवताच तहसीलदार राजेश जाधव यांनी संबंधित गावांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
जिल्हाधिकाऱ्यांचा 'सुरक्षा' संदेश
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः ग्रामीण भागात घरांच्या छतावरील पत्रे उडू नयेत म्हणून त्यावर दगड ठेवण्याची पद्धत आहे. "भूकंपाचा धक्का बसल्यास हे दगड डोक्यावर पडून इजा होऊ शकते, त्यामुळे तातडीने ते दगड काढून पत्रे बोल्टने पक्के करावेत," असा कळकळीचा सल्ला जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. तसेच, पुन्हा असा आवाज किंवा हादरा जाणवल्यास तातडीने घराबाहेर मोकळ्या जागेत यावे आणि प्रशासनाच्या आपत्कालीन क्रमांक ०२४६२-२३५०७७ वर संपर्क साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.