१० गुंठे शेतीत मिरची बीजोत्पादन करून दीड लाखाची केली कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 04:42 PM2019-09-24T16:42:52+5:302019-09-24T16:45:01+5:30

कंधार तालुक्यात उस्माननगर -लाठ खु.मध्ये शेडनेट हाऊसचा वापर  

Earnings of one and a half lakhs by generating chilli seeds in 10 guntha land | १० गुंठे शेतीत मिरची बीजोत्पादन करून दीड लाखाची केली कमाई

१० गुंठे शेतीत मिरची बीजोत्पादन करून दीड लाखाची केली कमाई

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्यांचा उपक्रम झाला कुतूहलाचा विषय१६ शेतकऱ्यांकडे तालुक्याचे लागले लक्ष 

कंधार :  तालुक्यात शेती फुलविण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. शासनाच्या योजनेतून शेडनेट हाऊस उभारणीसाठी १६ शेतकऱ्यांची निवड करुन ४ जणांना अनुदान वितरीत करण्यात आले. तसेच १२ शेतकऱ्यांना पुढील आठवड्यात अनुदान वितरीत होणार आहे. विष्णूदास इंगोले यांनी अवघ्या १० गुंठे शेतीत पक्के शेडनेट उभारून गावरान मिरची बियाणे उत्पादनातून दीड लाखांची कमाई करत शेती विकासाचा नवा अध्याय रचला आहे. उस्माननगर, लाठ खु. या गावांतील उपक्रमाने कुतूहल निर्माण केले आहे.

तालुक्यात   निसर्ग पावसाचा सतत लपंडाव व लहरीपणा असतो. त्याला शेतीमालाला मिळणारा बेभरवशाचा कमी भाव लागतो. त्यामुळे शेतीचे अर्थकारण दोलायमान असते. शेतकरी हा दुष्काळचक्राने भयंकर भरडतो. अशावेळी शासकीय योजनेचा आधार व नवीन करण्याची उमेद यांचा मेळ बसला की, उत्साह संचारतो. असेच १६ शेतकऱ्यांनी शेतीत नवा प्रयोग करण्याचा संकल्प पूर्ण करण्यावर भर दिला आहे.

विष्णूदास इंगोले यांनी १० गुंठे शेतीवर शेडनेट उभारले. या आकाराचे तीन शेडनेट त्यांनी उभारले आहेत. शेडनेटच्या सहाय्याने भाजीपाला-फळ पिकाचे बीजोत्पादन करण्यास प्राधान्य दिले. त्यांनी एका शेडनेट वर गावरान मिरची करिता ४ हजार खर्च करत जमीन तयार केली. नांगरटी, वखरणीकरिता ५ हजारांपेक्षा अधिक खर्च केला. मोफत मिळालेल्या मादी वाणाचे ५०० व नर वाणाचे २५० रोपे विशिष्ट अंतरावर योग्य लागवड केली. शेणखत व रासायनिक खतासाठी १५ हजार, कीटकनाशक व बुरशीनाशकाला २० हजार, मजुरी ५० हजार, मिरची झाडाची योग्य बांधणीसाठी २० हजार इतर खर्च असे १ ते सव्वा लाखांचा खर्च केला. 

मिरची संगोपनासाठी खताची मात्रा, सूक्ष्म मूलद्रव्यासह बेसल डोस, पाण्यात विरघळणारे खत, विशिष्ट उंचीवर रोपे आले की काही फांद्या छाटून रोपाची बांधणी, मादी झाडाचे संकरणाचे काम मादी रोपावरील न उमललेल्या फुलावरील कळी व नर पुंकेसर वेगळा करणे,  मादीवरील फुलातील स्त्रीकोश भाग  खुणेने वेगळा दर्शविणे, मादी झाडावरील फुलातील नर भाग काढून         टाकण्याचे कुशल काम आदी अतिशय योग्य पद्धतीने करत मिरची बहरली. या मिरचीचे बियाणे तयार केले.

शेडनेटसाठी २ लाख ३५ हजार रुपयांचे देय अनुदान
राज्य शासनाच्या कृषी विभागाने 'एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान' राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत शेडनेट उभारणीची मोहीम हाती घेतली. शेडनेटसाठी देय अनुदान सुमारे २ लाख ३५ हजार आहे. तालुक्यातील उस्माननगर, लाठ खु.येथील विष्णूदास इंगोले, शोभाबाई घोरबांड, द्वारकाबाई इंगोले, ज्योतीबाई घोरबांड, सज्जन इंगोले, सुप्रिया घोरबांड, संतोष गवारे,  आबाजी घोरबांड, प्रभाकर गवारे, खंडू इंगोले, अंकुश गवारे, श्रीकांत घोरबांड, आत्माराम मोरे, शशीकांत घोरबांड  या १५ शेतकऱ्यांची व गऊळ येथील एकाची निवड केली.

खर्च वगळता दीड लाखांचे निव्वळ उत्पन्न 
तालुक्यात मध्यम व हलक्या जमिनीचे व अल्पभूधारक  शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत.१० गुंठ्यात गावरान मिरची बीजोत्पादन २५ ते ३० किलो निघाले. प्रतिकिलो भाव सुमारे ९ हजार ५०० ते १० हजार ५०० असा लागला. एकूण उत्पन्न २.४० ते २.८० झाले. खर्च वगळता दीड लाखांचे निव्वळ उत्पन्न झाले. जिल्हाधिकारी अरूण डोंगरे व जि.कृषी अधिकारी रवीशंकर चलवदे यांच्या मार्गदर्शनाखाली ता.कृषी अधिकारी रमेश देशमुख यांच्या योग्य सूचनेने मंडळ कृषी अधिकारी नागोराव अंबुलगेकर,  तंत्रज्ञ, कृषी सहायक, पर्यवेक्षक, कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. 

तालुक्यातील १६ शेतकऱ्यांची शेडनेट उभारणीसाठी निवड करण्यात आली. त्यातील ४ जणांना अनुदान वितरीत करण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना येत्या काही दिवसांत उपलब्ध अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. शेतकरी शासनाच्या योजनेतून शेती फुलवून आर्थिक स्तर वाढविण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. 
- रमेश देशमुख, (ता.कृषी अधिकारी ,कंधार.)

 

Web Title: Earnings of one and a half lakhs by generating chilli seeds in 10 guntha land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.