विद्यार्थीप्रिय उपक्रमांमुळे शाळेचा जिल्हाभरात वाढला नावलौकिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:05 IST2019-06-19T00:04:19+5:302019-06-19T00:05:41+5:30
राज्यातील नामवंत असलेल्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या शाळेपैकी एक जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ब्रँच मुखेड. या शाळेची स्थापना १८८९ मध्ये झाली असून १८८९ पासून ते २०१२ पर्यंत भाड्याच्या इमारतीत होती़ त्यानंतर २०१३ पासून या शाळेला स्वत:च्या मालकीची इमारत मुख्याध्यापक दिलीप किनाळकर यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झाली आहे. ही शाळा शहरातील सर्वात जुनी शाळा आहे.

विद्यार्थीप्रिय उपक्रमांमुळे शाळेचा जिल्हाभरात वाढला नावलौकिक
दत्तात्रय कांबळे।
मुखेड : राज्यातील नामवंत असलेल्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या शाळेपैकी एक जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ब्रँच मुखेड. या शाळेची स्थापना १८८९ मध्ये झाली असून १८८९ पासून ते २०१२ पर्यंत भाड्याच्या इमारतीत होती़ त्यानंतर २०१३ पासून या शाळेला स्वत:च्या मालकीची इमारत मुख्याध्यापक दिलीप किनाळकर यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झाली आहे. ही शाळा शहरातील सर्वात जुनी शाळा आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळातील या शाळेची स्थापना असल्यामुळे व दर्जेदार शैक्षणिक सुविधा व एक प्रयोगशील शाळा म्हणून शहरातील मुलांचा याच शाळेत प्रवेश घेण्याचा ओढा आहे. शाळेत पूर्वप्राथमिक ते ७ वीपर्यंत वर्ग असून प्रत्येक वर्गाच्या ४ तुकड्या आहेत तर विद्यार्थीसंख्या ६९५ मुले, ६७४ मुली असे एकूण १३६९ एवढी आहे. यासाठी १५ शिक्षक, १९ शिक्षिका असे ३४ व पूर्व प्राथमिकसाठी ९ शिक्षिका व ३ अतिथी निर्देशक शिक्षिका असे एकूण ४६ शिक्षक, शिक्षिका अध्यापनाचे काम करतात. शाळेत समृद्ध वाचनालय, सर्व वैज्ञानिक साहित्य साधनांनी युक्त अशी भव्य प्रयोगशाळा, बालवीर-वीरबाला पथक, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सामान्यज्ञानावर आधारित चाचण्या, अबॅकसचे वर्ग, स्पर्धा परीक्षेची उत्तम तयारी करुन घेण्यात येते़
आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी अस्थायी संलग्न आहे. या शाळेचे आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने पर्यवेक्षकाकडून मूल्यमापन केले जाते़ सर्वच अध्यापक तयारी करुनच अध्यापन करतात. संदर्भपुस्तकांचा वापर करुन विषयाला न्याय देणारा अध्यापक वर्ग या शाळेत आहे.
३६५ दिवस सुरु राहते शाळा
दिवाळी व उन्हाळी वासंतिक वर्ग या ठिकाणी घेण्यात येतात़ शाळा १०० टक्के डिजिटल झाली असून लोकसहभागातून प्रत्येक वर्गात एलईडी व प्रोजेक्टरचा वापर करण्यात येतो़ २०० विद्यार्थ्यांचे कब बुलबुल, स्काऊट गाईडचे पथक, राष्ट्रमाता जिजाऊ लेझीम पथक, आनंदनगरी यासारख्या उपक्रमातून व्यावहारिक ज्ञान येथे दिले जाते़
विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात रुचकर भोजन,फिल्टरचे पाणी उपलब्ध आहे. अध्ययन-अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांना खेळाचे विविध साहित्य उपलब्ध आहे. त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे येथे लक्ष दिले जाते़ वेगवेगळे स्वच्छतागृह उपलब्ध आहेत़
- दिलीप किनाळकर, मुख्याध्यापक