टायर फुटल्याने चालकाने ट्रॉली रस्त्यावरच सोडली; त्यावर दुचाकी धडकून दोघे जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 15:05 IST2025-04-30T14:59:31+5:302025-04-30T15:05:02+5:30
या प्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध उमरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

टायर फुटल्याने चालकाने ट्रॉली रस्त्यावरच सोडली; त्यावर दुचाकी धडकून दोघे जागीच ठार
उमरी : रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडकून दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना तालुक्यातील रामखडक गावाजवळ २८ एप्रिल रोजी रात्री घडली. आनंदा दिगंबर खांडरे (वय ४५) व माधव संभाजी जोगदंड (वय ४०, दोघे रा. सावरगाव कला) अशी अपघातात मरण पावलेल्यांची नावे आहेत.
आनंदा खांडरे व माधव जोगदंड हे दोघेजण दुचाकीवर उमरीहून आपल्या गावाकडे जात होते. यावेळी रस्त्यावर सिमेंटने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली उभी होती. टायर फुटल्यामुळे ही ट्रॉली रस्त्यातच सोडून चालक निघून गेला होता. अंधारात ट्रॉली नीट दिसली नसल्याने दुचाकीची ट्रॉलीला जोराची धडक बसली. दोघेही गंभीररित्या जखमी होऊन रस्त्यावरच पडले.
पोलिस निरीक्षक अंकुश माने यांना ही माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन गंभीर जखमी झालेल्या दोघांनाही पोलिस जीपमधून उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. एम. चंदापुरे यांनी तपासणी केली असता दोघांचाही मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध उमरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली एस. एम. आरमाळ हे पुढील तपास करीत आहेत.