राज्यातील ५० ऐतिहासिक तीर्थक्षेत्रांवर माहितीपट, मराठवाड्यातील १३ पुरातन मंदिरांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 16:00 IST2025-12-05T15:58:04+5:302025-12-05T16:00:02+5:30
या माहितीपटाच्या निर्मितीसाठी राज्य शासनाने ४ कोटी ६२ लाख रुपये इतक्या भरीव रकमेला प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

राज्यातील ५० ऐतिहासिक तीर्थक्षेत्रांवर माहितीपट, मराठवाड्यातील १३ पुरातन मंदिरांचा समावेश
यशवंत परांडकर
नांदेड : महाराष्ट्राला लाभलेला ऐतिहासिक वारसा आणि अद्वितीय स्थापत्यशैलीमुळे महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या राज्यातील ५० तीर्थक्षेत्रांवर माहितीपटाची निर्मिती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ३ डिसेंबर २०२५ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या माहितीपटाच्या निर्मितीसाठी राज्य शासनाने ४ कोटी ६२ लाख रुपये इतक्या भरीव रकमेला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटन आणि सांस्कृतिक स्थळांना प्रोत्साहन मिळणार आहे.
शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने या संदर्भात सविस्तर अध्यादेश निर्गमित केला आहे. माहितीपटात समाविष्ट करण्यात येणाऱ्या ऐतिहासिकदृष्ट्या व स्थापत्यदृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण असणाऱ्या खालील ५० तीर्थस्थळांचा समावेश आहे.
पुणे जिल्हा : नागेश्वर मंदिर (खिरेश्वर, ता. जुन्नर), मोरया गणपती (वडगाव काशिमबेग, ता. आंबेगाव), रामलिंग मंदिर (शिरूर, ता. शिरूर), सोमेश्वर (सासवड, ता. सासवड), नारायणेश्वर (नारायणपूर, ता. पुरंदर).
सातारा जिल्हा : कात्रेश्वर (कातरखटाव) व सोमलिंग (गुरसाळे, ता. खटाव), केदारेश्वर (परळी) व गणपती (अंगापूर, ता. सातारा).
सांगली जिल्हा : वाटेगाव कऱ्हाड (वाटेगाव, ता. वाळवा), महादेव मंदिर (इरली) व महादेव मंदिर (कुची, ता. कवठेमहांकाळ)
रत्नागिरी जिल्हा : व्याडेश्वर (गुहागर, ता. गुहागर), संगमेश्वर (संगमेश्वर, ता. संगमेश्वर), कनकादित्य (कशेळी, ता. राजापूर) आणि शिव मंदिर-रामेश्वर (काळबादेवी, ता. रत्नागिरी),
सिंधुदुर्ग : सातेरी (मातोंड/सातेरी, ता. वेंगुर्ला)
कोल्हापूर जिल्हा : महालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर), पळसंबे (पळसंबे, ता. गगनबावडा) आणि ओंकारेश्वर (कोल्हापूर)
ठाणे जिल्हा : महादेव मंदिर (लोनाड, ता. भिवंडी)
उस्मानाबाद जिल्हा : माणकेश्वर (माणकेश्वर, ता. माणकेश्वर)
सोलापूर जिल्हा : माढेश्वरी (माढा, ता. माढा), शिव मंदिर, कोरवली; पंढरपूर शहर (ता. पंढरपूर)
बीड जिल्हा : विठ्ठल महादेव मंदिर (चिंचवण, ता. धारूर), लक्ष्मी-विष्णू मंदिर (मंजरथ, ता. माजलगाव), रामेश्वर-शुक्लतीर्थ (लिंबगाव, ता. बीड), बाराखंबी (अंबेजोगाई)
लातूर जिल्हा : सदाशिव (भूतामुगली) व नीळकंठेश्वर महादेव (निलंगा), विठ्ठल मंदिर, (पानगाव, ता. लातूर)
नांदेड जिल्हा : महादेव मंदिर (येवती, ता. धर्माबाद)
अहिल्यानगर जिल्हा : विठ्ठल रुक्मिणी मंदिर (श्रीगोंदा) व भवानी जगदंबा मंदिर (टाहाकरी, ता. अकोले)
जालना जिल्हा : खंडोबा बिलकेश्वर (चिंचखेड, ता. अंबड)
छत्रपती संभाजीनगर जिल्हा : सिद्धेश्वर मंदिर (अकोले), सिद्धेश्वर मंदिर (कनकावती, ता. कन्नड)
परभणी जिल्हा : त्रिदल/पिंगळेश्वर शिव मंदिर (पिंगळी, ता. परभणी)
हिंगोली जिल्हा : कानिफनाथ गड, (खैरी घुमट, ता. सेनगाव)
अमरावती जिल्हा : खंडेश्वर (नांदगाव खंडेश्वर)
बुलढाणा जिल्हा : शिव मंदिर (धोत्रा नांदाई, ता. देऊळगाव राजा), वैष्णव मंदिर (कोठाळी, ता. पिंपळगाव राजा), सदाशिव मंदिर-बुधनेश्वर (मढ, ता. बुलढाणा)
वाशिम जिल्हा : बालाजी (वाशिम शहर)
यवतमाळ जिल्हा : कमलेश्वर शिव मंदिर (लोहारा, ता. यवतमाळ), शिव मंदिर (पिंपरी कलागा, ता. नेर परसोपंत), दक्षेश्वर (लालखेड) व शिव मंदिर (चिकन खुर्द, ता. दारव्हा)
भंडारा जिल्हा : वाळकेश्वर मंदिर (वाकेश्वर, ता. मोहाडी)
कार्यपद्धतीनुसार माहितीपट तयार करण्याचे निर्देश
हा माहितीपट माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संचालक, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये यांना या प्रकल्पासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. या माहितीपटाद्वारे महाराष्ट्रातील समृद्ध सांस्कृतिक आणि स्थापत्य वारसा देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.