हमालीवरुन वाद केला अन् जीव गमावून बसला, नांदेडात भरदिवसा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 14:05 IST2021-12-22T14:04:35+5:302021-12-22T14:05:02+5:30

काही तासाच्या आत आरोपी अनिल जोंधळे याला अटक करण्यात आली.

Disputed over attack and lost his life, murder in Nanded | हमालीवरुन वाद केला अन् जीव गमावून बसला, नांदेडात भरदिवसा खून

हमालीवरुन वाद केला अन् जीव गमावून बसला, नांदेडात भरदिवसा खून

नांदेड : शहरातील मुरमुरा गल्ली भागात हमालीवरुन झालेल्या वादानंतर एका हमालाचा खंजीर खुपसून खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणातील आरोपीला वजिराबाद पोलिसांनी अटक केली आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.

मंगळवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास मुरमुरा गल्ली भागातील राधे गोविंद ट्रेडिंग कंपनी आणि श्री सेवा ट्रेडिंग कंपनीसमोर लखन उत्तम जाधव (रा. देवापूर ता. मुदखेड) आणि अनिल नामदेव जोंधळे (रा. गोविंद कॉलनी, सिडको) यांच्यात हमालीच्या पैशावरुन वाद झाला होता. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यावेळी शेकडो नागरिक या दोघांतील वाद पाहत होते. त्याचवेळी अनिल जोंधळे याने खंजीरने लखन जाधव याच्या पोटावर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लखन जाधव याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी अनिल जोंधळे याने घटनास्थळावरुन पळ काढला होता. घटनास्थळी पोनि.द्वारकादास चिखलीकर, पोनि. जगदीश भंडरवार यांनी धाव घेतली. तसेच आरोपीच्या अटकेसाठी पथकाला पाठविले होते. काही तासाच्या आत आरोपी अनिल जोंधळे याला अटक करण्यात आली. या प्रकरणात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

खून होताना अनेक प्रत्यक्षदर्शी
अनिल जोंधळे आणि लखन जाधव यांचा वाद सुरु असताना अनेकजण त्या ठिकाणी होते. परंतु कुणीही मध्यस्थी केली नाही. जोंधळे याने लखन जाधव यांच्यावर खंजीरने वार केल्यानंतर तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. परंतु यावेळीही कोणी मदतीसाठी आले नाही.

Web Title: Disputed over attack and lost his life, murder in Nanded