dispute between Congress-BJP corporators in Nanded Municipality | नांदेडमध्ये काँग्रेस-भाजप नगरसेवकांत धक्काबुक्की
नांदेडमध्ये काँग्रेस-भाजप नगरसेवकांत धक्काबुक्की

ठळक मुद्देमनपासमोर भाजपची निदर्शने

नांदेड : ‘काँग्रेस नगरसेवक भाजपाच्या वाटेवर’ वृत्तावरून गुरुवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेस नगरसेवक आणि भाजपचे नगरसेवक दीपक रावत यांच्यात धक्काबुक्कीचा प्रकार घडला.   या गोंधळामुळे महापौर दीक्षा धबाले यांनी भाजपचे रावत यांना एक दिवसासाठी निलंबित करण्याचे आदेश दिले. या निर्णयाच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. 

विरोधी पक्षनेत्या गुरप्रितकौर सोडी यांनी केंद्र सरकारने कलम ३७० आणि ३५ (अ) रद्द केल्याबद्दल, मुस्लिम महिलांना न्यायासाठी तलाक कायदा केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. या ठरावावरील चर्चेत साबेर चाऊस, फारुख अली खान यांनी सदर कायदा हा मुस्लिम महिलांनी नाकारल्याचे सांगितले. त्याचवेळी सभागृहनेते विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी काँग्रेस नगरसेवकासंदर्भात आलेल्या वृत्ताबाबत चर्चा सुरू केली.  भाजपचे दीपक रावत यांच्या माहितीवरुन सदर वृत्त पसरले. त्यामुळे काँग्रेसचे कोणते नगरसेवक  भाजपाच्या वाटेवर आहेत याचा खुलासा करावा, अशी मागणी काँग्रेसचे अब्दुल फईम यांनी केली. याच विषयावर फईम आणि रावत आमने-सामने आले. फईमच्या समर्थनार्थ काँग्रेसच्या सर्वच नगरसेवकांनी रावत यांच्या अंगावर धाव घेतली. त्यावेळी काही वेळ तणाव निर्माण झाला. याच गोंधळाच्या वातावरणात महापौर धबाले यांनी रावत यांना एक दिवसासाठी निलंबित केल्याची घोषणा केली. 

भाजपाने सदर निलंबन कलम ३७० च्या रद्द करण्याच्या अभिनंदन ठरावावरुन झाल्याची भूमिका मांडली. काँग्रेसच्या या भूमिकेचा त्यांनी निषेध केला. काँग्रेसकडून मात्र हे निलंबन खोट्या माहितीच्या आधारावरुन प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर झालेल्या गोंधळामुळे झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महापौर दीक्षा धबाले यांनीही रावत यांचे निलंबन सभागृहातील गैरवर्तनामुळे केल्याचे स्पष्ट केले. 

भाजपकडून घटनेचा निषेध 
भाजपचे नगरसेवक रावत यांना निलंबित केल्याची माहिती मिळताच भाजपचे शहर महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, मिलिंद देशमुख, प्रविण साले, नगरसेविका बेबीताई गुपिले, शांताबाई गोरे, उपजिल्हाध्यक्ष कैलास सावते, विनय सगर, जयप्रकाश येवले, युवा मोर्चाचे सोनु कल्याणकर, महादेवी मठपती, प्रभु कपाटे, शैलेंद्र ठाकूर, शरद यादव, धनराज मंत्री आदी भाजपा कार्यकर्त्यांनी रावत यांच्या निलंबनाचा निषेध केला.

विरोधी पक्षनेत्या आंदोलनापासून दूर
रावत यांच्या समर्थनार्थ भाजपाचे शहर पदाधिकारी धावले असले तरी भाजपच्या विरोधी पक्षनेत्या गुरप्रीतकौर सोडी या मात्र या आंदोलनापासून दूर राहिल्या.  


Web Title: dispute between Congress-BJP corporators in Nanded Municipality
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.