शिस्त, सेवा आणि श्रद्धा! 'हिंद दी चादर' सोहळ्यासाठी नांदेड सज्ज, जगभरातून भाविक येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 18:04 IST2026-01-23T18:03:20+5:302026-01-23T18:04:42+5:30
एकाच वेळी दीड लाख भाविकांचे भोजन! नांदेडच्या 'लंगर' सेवेची जगभर चर्चा; २० लाख लोकांसाठी अहोरात्र चालणार चुली.

शिस्त, सेवा आणि श्रद्धा! 'हिंद दी चादर' सोहळ्यासाठी नांदेड सज्ज, जगभरातून भाविक येणार
नांदेड: शीख धर्माचे दहावे गुरु, गुरु गोविंदसिंह महाराज यांच्या पावन चरणस्पर्शाने पुनीत झालेली नांदेड नगरी पुन्हा एकदा ऐतिहासिक सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे. 'हिंद दी चादर' श्री गुरू तेग बहादूरजी महाराजांच्या ३५० व्या शहिदी समागम सोहळ्यानिमित्त अवघ्या नांदेडमध्ये उत्साहाचे आणि श्रद्धेचे वातावरण आहे. २००८ मधील गुरु-त्ता-गद्दी सोहळ्याच्या स्मृतींना उजाळा देत, जगभरातून लाखो भाविक या सोहळ्यासाठी नांदेडमध्ये दाखल होत आहेत.
सातासमुद्रापारहून भाविकांचे आगमन
कॅनडा, इंग्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह देशातील विविध राज्यांतून भाविक विशेष रेल्वे आणि विमानांनी नांदेडकडे रवाना झाले आहेत. शहरातील रेल्वे स्थानक, बसस्थानक आणि प्रमुख मार्गांवर निळ्या आणि केशरी फेट्यांमधील भाविकांची वर्दळ वाढली असून, संपूर्ण शहर 'वाहेगुरू'च्या जयघोषाने निनादत आहे.
२० लाख भाविकांच्या भोजनाची भव्य व्यवस्था
२४ आणि २५ जानेवारी रोजी होणाऱ्या या सोहळ्यासाठी प्रशासनाने आणि गुरुद्वारा समितीने जय्यत तयारी केली आहे. मोदी मैदानावर १० लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता असून, दोन दिवसांत तब्बल २० लाख भाविकांच्या भोजनाची (लंगर) सोय करण्यात आली आहे. लंगर साहिब गुरुद्वारा आणि इतर संस्थांतर्फे ८ मोठे लंगर चालवले जाणार आहेत. या भोजनासाठी १६ भव्य चुली आणि ७ अत्याधुनिक स्टीमर बॉयलरचा वापर केला जाणार असून, एकाच वेळी १.५ लाख लोक पंगतीत बसू शकतील अशी व्यवस्था आहे.
हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी आणि आकर्षक विद्युत रोषणाई
२४ जानेवारी रोजी निघणाऱ्या भव्य मिरवणुकीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे. संपूर्ण नांदेड शहर, विशेषतः सचखंड गुरुद्वाराकडे जाणारे रस्ते आणि चौक आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहेत. पोलीस यंत्रणा, महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने सुरक्षा, आरोग्य आणि पाणीपुरवठ्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. हा सोहळा केवळ धार्मिक नसून, तो सेवाभाव, एकता आणि शांततेचा संदेश जगाला देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.