पित्यानंतर पुत्रानेही हरवले ! देगलूर पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकरांचा दणदणीत विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2021 04:51 PM2021-11-02T16:51:33+5:302021-11-02T16:52:46+5:30

Deglur Bypoll: पिता स्व. रावसाहेब अंतापूरकर आणि त्यांचा पुत्र जितेश यांनी २०१९-विधानसभा आणि त्यानंतर २०२१ ची पोटनिवडणुक अशा लागोपाठ दोन निवडणुकीत सुभाष साबणे यांचा पराभव केला.

Deglur Bypoll: after father son defeated same candidate ! Jitesh Antapurkar's resounding victory in Deglaur by-election | पित्यानंतर पुत्रानेही हरवले ! देगलूर पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकरांचा दणदणीत विजय

पित्यानंतर पुत्रानेही हरवले ! देगलूर पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकरांचा दणदणीत विजय

Next

नांदेड : पहिल्या फेरीपासून मिळवलेली आघाडी कायम ठेवत कॉंग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकरा यांनी देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. अंतापूरकर यांना ३० व्या फेरी अखेर १ लाख ८ हजार ७८९ मते मिळाली. तर भाजपच्या सुभाष साबणे यांना ६६ हजार ८७२ मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावरील वंचितचे डॉ. उत्तम इंगोले यांना ११ हजार ३४७ मते मिळाली. जितेश अंतापूरकर यांनी तब्बल ४१ हजार ९३३ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे जितेश यांच्या विजयी मतांची आघाडी त्यांचे वडील रावसाहेब अंतापूरकर यांनी २०१९ विधानसभेच्या आघाडीपेक्षा दुप्पट आहे. 

पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळविल्यानंतर महाविकास आघाडीसमोर देगलूर-बिलोली पोटनिवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. पंढरपूर पोटनिवडणुकीचा चमत्कार पुन्हा दिसावा यासाठी शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना भाजपने पक्षात घेत थेट निवडणूक रिंगणात उतरवले. तर कॉंग्रेसने स्व. रावसाहेब अंतापूरकर यांचा मुलगा जितेश अंतापूरकर यांना तिकीट दिले. महाविकास आघाडीने ही निवडणूक एकत्रित लढवली. सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण यांनी या निवडणुकीच्या प्रचाराची सर्वसुत्रे हाती घेत यंत्रणा राबवली. दुरारीकडे खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजपच्या मातब्बर नेत्यांच्या सभांचे आयोजन करत रंगत वाढवली. वंचित बहुजन आघाडीने डॉ. उत्तम इंगोले यांना उभे केल्याने निवडणुकीत चुरस वाढवली होती. वंचितचे बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह इतर नेत्यांच्या सभांना मिळणाऱ्या प्रतिसादाने कॉंग्रेस-भाजपचे टेन्शन वाढले होते.

या निवडणुकीत ६४.९५ %   इतकं मतदान झाल.  एकूण २ लाख ९८ हजार ५३५ मतदारांपैकी १ लाख ९० हजार ८०० इतकं मतदान झाले होते. एकूण १२ उमेदवार रिंगणात होते. मात्र, महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशीच थेट लढत झाली. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने देखील लक्षणीय मते घेतली आहेत. कॉंग्रेसचे जितेश अंतापूरकर यांनी पहिल्या फेरीत १६२४ मतांची आघाडी घेतली. एकूण ३० फेऱ्यात अंतापूरकर यांनी आघाडी टिकवून ठेवत अखेर ४१ हजार ९३३ मतांनी विजय मिळवला.

पिता-पुत्राने केला एकाच उमेदवाराचा पराभव 
स्व.रावसाहेब अंतापूरकर यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार असलेले सुभाष साबणे यांचा तब्बल २२ हजार ३३० मतांनी पराभव केला होता. रावसाहेब अंतापूरकर यांना ८८ हजार १८१ तर सुभाष साबणे यांना ६५ हजार ८५१ मते मिळाली होती. पोटनिवडणुकीत सुभाष साबणे हे भाजपचे तर स्व. रावसाहेब अंतापूरकर यांचा मुलगा जितेश यांनी महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवली. जितेश यांनी साबणे यांच्यावर तब्बल ४१ हजार ९३३ मतांनी विजय मिळवला. पिता आणि पुत्राने लागोपाठ दोन निवडणुकीत एकाच उमेदवाराचा पराभव केल्याने ही निवडणूक चिरकाळ स्मरणात राहील.

Web Title: Deglur Bypoll: after father son defeated same candidate ! Jitesh Antapurkar's resounding victory in Deglaur by-election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.