नांदेडात मृत्यूसत्र थांबेना; रविवारी सकाळपर्यंत २४ तासांत १५ मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 15:19 IST2023-10-09T15:15:25+5:302023-10-09T15:19:49+5:30
आठवडाभरात रुग्णांच्या मृत्यूचा आकडा ८७ वर पोहोचला आहे; तर दुसरीकडे रुग्ण बरे होऊन घरी परतण्याचेही प्रमाणही अधिक आहे.

नांदेडात मृत्यूसत्र थांबेना; रविवारी सकाळपर्यंत २४ तासांत १५ मृत्यू
नांदेड : येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. रविवारी सकाळपर्यंत गेल्या २४ तासांत आणखी १५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आठवडाभरात रुग्णांच्या मृत्यूचा आकडा ८७ वर पोहोचला आहे; तर दुसरीकडे रुग्ण बरे होऊन घरी परतण्याचेही प्रमाणही अधिक आहे.
२४ तासांत २४ रुग्णांच्या मृत्यूनंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यानंतरही दररोज मृत्यूचे हे सत्र सुरूच आहे. मृतांमध्ये रेफर अन् अत्यवस्थ रुग्ण अधिक आहेत. रविवारी सकाळपर्यंत गेल्या २४ तासांत १५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यात ६ नवजात, २ बालके आणि वयस्कर असलेल्या ७ जणांचा समावेश आहे; तर ६२२ रुग्णांनी ओपीडीमध्ये उपचार घेतले असून, ७३२ रुग्ण सध्या दाखल आहेत. ९७ रुग्ण उपचारानंतर ठणठणीत झाले. ५९ शस्त्रक्रियांपैकी ४४ मोठ्या, तर १५ शस्त्रक्रियांचा समावेश आहे. १६ प्रसूती झाल्या असून त्यातील ८ नॉर्मल, तर ७ महिलांवर सीझर करण्यात आले.
औषधे बाहेरूनच
रुग्णालयात औषधांचा पुरवठा असल्याचा दावा शासनाकडून करण्यात येत असला तरी अजुनही रुग्णांच्या नातेवाईकांना औषधे बाहेरून आणावी लागत आहेत. दुसरीकडे दोन दिवसात सामाजिक संस्थांनी सुमारे १२ लाख रुपयांची औषधे रुग्णालयाला दान स्वरुपात दिली आहेत. तरीही तुटवडा कायम असल्याचे दिसत आहे.