क्रौर्याची हद्द! नांदेडमध्ये युवकाने कुत्र्याला हवेत फिरवून रस्त्यावर आपटले, प्राणीप्रेमी संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 17:50 IST2025-05-16T17:49:04+5:302025-05-16T17:50:53+5:30
कुत्र्यावर अमानुष अत्याचार; नांदेड पोलिसांकडून युवकाचा शोध सुरू, समाजमाध्यमांवर संतापाची लाट

क्रौर्याची हद्द! नांदेडमध्ये युवकाने कुत्र्याला हवेत फिरवून रस्त्यावर आपटले, प्राणीप्रेमी संतप्त
नांदेड : अंतःकरण हेलावून टाकणारी एक घटना नांदेड शहरात उघडकीस आली आहे. एका युवकाने एका निरपराध कुत्र्याला पायाला धरून रस्त्यावर जोरजोरात आपटले. या अमानुष प्रकाराचा व्हिडिओ समाज माध्यमांवर वेगाने व्हायरल झाला असून, या घटनेवरून प्राणीप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
ही धक्कादायक घटना नांदेडमधील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की एक युवक कुत्र्याचा मागचा पाय पकडून त्याला गरगर फिरवत आहे आणि नंतर जोरात रस्त्यावर आपटत आहे. इतकंच नव्हे तर, या प्रकारादरम्यान तिथे उपस्थित असलेले आठ ते दहा जण शांतपणे पाहत होते. काहीजण हसत असल्याचेही व्हिडिओत स्पष्ट दिसते. हे दृश्य पाहून कोणाचंही मन विषण्ण होईल.
कुत्र्याला हवेत फिरवून जमिनीवर आपटलं; नांदेड पोलिसांकडून युवकाचा शोध सुरू, समाजमाध्यमांवर संतापाची लाट #nanded#marathwadapic.twitter.com/TL4CqAjhSL
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) May 16, 2025
दुर्दैवाने, कोणीही या निर्दयी कृत्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला नाही. या अमानुष कृत्याची नोंद घेत, पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली आहे. संबंधित युवकाचे नाव शेख इरफान असल्याचे निष्पन्न झाले आहे आणि सध्या सायबर सेल आणि शिवाजीनगर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. प्राणीप्रेमींनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, संबंधित युवकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. प्राण्यांवर क्रौर्य करणाऱ्यांवर कायदेशीर शिक्षा व्हावी, यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.