रोहित आर्याने ओलीस ठेवलेल्या १७ विद्यार्थ्यांमध्ये होते पाच नांदेडचे; अनुभवला थरारक अनुभव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 16:45 IST2025-11-01T16:37:38+5:302025-11-01T16:45:24+5:30
१७ विद्यार्थ्यांच्या ओलीस नाट्यात नांदेडातील ५ मुलांचा थरारक अनुभव

रोहित आर्याने ओलीस ठेवलेल्या १७ विद्यार्थ्यांमध्ये होते पाच नांदेडचे; अनुभवला थरारक अनुभव!
नांदेड: मुंबईच्या पवई येथे रोहित आर्या याने १७ विद्यार्थ्यांना ओलीस ठेवल्याच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. त्यात नांदेडातील एका शाळेतील पाच विद्यार्थ्यांचाही समावेश होता. या ओलीस नाट्याची सुरुवात दोन महिन्यांपूर्वीच आर्याने केली होती. हॉरर चित्रपट काढणार असल्याचे सांगून त्याने कास्टिंग एजन्सीमार्फत राज्यभरातील शाळांना चित्रपटात काम करण्यासाठी फ्रेश मुले पाहिजेत म्हणून संदेश पाठविले होते.
शाळांनी हे मेसेज पालकांना पाठविले. त्यानुसार ॲक्टिंगचे व्हिडीओ तयार करून ते एजन्सीकडे पाठविण्यात आले होते. त्यानंतर ओलीस नाट्य घडले. रोहित आर्या याने चित्रपट काढणार असल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी वेगवेगळ्या शाळांतील विद्यार्थ्यांकडून ॲक्टिंगचे व्हिडीओ मागविण्यात आले होते. शाळांनी ॲक्टिंगमध्ये रस असलेल्या मुलांच्या पालकांना हे मेसेज पाठविले. राज्यातून अशाप्रकारे जवळपास ८०० व्हिडीओ विद्यार्थ्यांनी पाठविले होते. त्यापैकी ८० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यांना पाच दिवसांपूर्वी मुंबईत बोलाविण्यात आले होते. ए. आर. स्टुडीओ इथे पुन्हा ऑडिशन घेऊन ८० पैकी ३५ विद्यार्थ्यांची निवड केली. त्यात पुन्हा कपात करून २० विद्यार्थ्यांची नावे निश्चित केली. शेवटी १७ विद्यार्थी फायनल करण्यात आले. त्यामध्ये नांदेडातील पाच विद्यार्थ्यांचा समावेश होता.
शूटिंग असल्याचे पालकांना सांगितले
डिसेंबर महिन्यात १४ दिवसांचे शूटिंग असल्याचे त्यांच्या पालकांना सांगण्यात आले होते. चार दिवसांच्या वर्कशॉपमध्ये काही कलाकारही तिथे येऊन गेले होते. सर्व काही चित्रपटासारखे चाललेय, असे पालकांना वाटत होते. परंतु त्यानंतर चित्रपटात ओलीस नाट्याचा सीन असल्याचे सांगून आर्या याने खरोखरच त्या १७ मुलांना ओलीस ठेवले. अशी आपबिती नांदेडात परत आलेल्या एका पालकाने सांगितली. या प्रकारामुळे नांदेडातील पाच विद्यार्थी आणि त्यांचे पालक भीतीच्या सावटाखाली आहेत.
ओलीस नाट्याचे केले शूटिंग
आर्या याने मुलांच्या पालकांना चित्रपटातील ओलीस नाट्याचे शूटिंग करावयाचे आहे असे सांगितले. पालकांना इमारतीच्या खाली उभे केले आणि मुलांना खिडकीतून हात दाखवून ओरडण्याचे शूटिंगही केले. परंतु त्यानंतर काही पालकांना फोन करून माझी लढाई सिस्टीमच्या विरोधात आहे. तुमच्या मुलांना धक्काही लागणार नाही, असे आश्वासन दिले. त्यानंतर मात्र त्याने पोलिसांशी संपर्क करावयाचा असल्यास करा, असा दम भरल्याचे सांगितल्याची प्रतिक्रिया नांदेडातील एका पालकाने दिली.