यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 05:27 IST2025-07-04T05:25:52+5:302025-07-04T05:27:17+5:30
९ सुविधा केंद्रचालक हे बीड जिल्ह्यातील परळीचे आहेत, तर काही महाभागांनी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावाने जिल्ह्यात पीक विमा भरला आहे.

यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
नांदेड : बीड जिल्ह्यातील बोगस पीक विमा घोटाळा राज्यभर गाजल्यानंतर सोमवारी रात्री नांदेडातही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जिल्ह्यात २०२४ पासून तब्बल ४ हजार ४५३ शेतकऱ्यांच्या नावावर ४० सेतू सुविधा केंद्र चालकांनी बोगस विमा भरला होता. त्यात ९ सुविधा केंद्रचालक हे बीड जिल्ह्यातील परळीचे आहेत, तर काही महाभागांनी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावाने जिल्ह्यात पीक विमा भरला आहे.
पंतप्रधान पीक विमा योजना ही शासन आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत चालविली जाते. २०२४ पासून काही सामाईक सुविधा केंद्र चालकांनी शासनाच्या मालकीच्या, संस्थांच्या नावावर असलेल्या, करार, संमतीपत्र नसलेल्या जमिनीवर शेतकऱ्यांच्या नावे पीक विमा भरला.
त्यात ४० सेतू सुविधा केंद्र चालकांची नावे पुढे आली. त्यामध्ये परळी, परभणी, पुणे, लातूर, जालना, नांदेड तसेच उत्तर प्रदेशातील सेतू सुविधा केंद्र चालकांचा समावेश होता. बीड जिल्ह्यातील नऊ सुविधा केंद्र चालकांचाही नांदेडातील घोटाळ्यात सहभाग आहे.
शेतकऱ्यांना सरकार काही फुकट देत नाही
जीएसटीच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्याकडून ११ हजार रुपये घेते, म्हणजे शेतकऱ्यांना आपण काहीच फुकट देत नाही, अशी टीका विराेधी पक्षांनी विधानसभेत केली आहे.