नांदेड जिल्ह्यात प्रथमच आढळली मगर; वनविभागाच्या पथकाने मोठ्या धाडसाने शेतातून पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 15:51 IST2025-02-11T15:50:14+5:302025-02-11T15:51:29+5:30
लोहा तालुक्यातील घोटका येथील शेतकऱ्याच्या शेतात मगर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

नांदेड जिल्ह्यात प्रथमच आढळली मगर; वनविभागाच्या पथकाने मोठ्या धाडसाने शेतातून पकडले
- शेखर पाटील
मुखेड ( नांदेड) : मुखेड वनपरिक्षेत्रात लोहा तालुक्यातील घोटका येथील एका शेतात मंगळवारी पहाटे १ वाजेच्या दरम्यान दीड वर्षाची नर जातीची मगर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने मगरीस शेतातून पकडले आहे. मात्र, शेतात अचानक मगर आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.नांदेड जिल्ह्यात प्रथमच मगर आढळून आल्याची माहिती आहे.
घोटका येथील शेतकरी शेषेराव यादव कदम यांच्या शेतात मगर आढळल्याची माहिती सरपंच संग्राम सुरनर यांनी वनपाल धोंडगे यांना मंगळवारी पहाटे दिली. वनपाल शंकरराव धोंडगे, वनरक्षक अरुण राठोड व सर्पमित्र सिद्धार्थ कांबळे, नादान शेख यांनी लागलीच शेतात धाव घेत मगरीस चिमट्याच्या सहाय्याने पकडले. त्यानंतर सकाळी ११ वाजता मुखेड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात मगरीवर डॉ. धनराज मुर्कीकर यांनी प्राथमिक उपचार केले. सध्या ही मगर वनक्षेत्रपाल अधिकारी कार्यालयात ठेवण्यात आली आहे. मगर पकडून कार्यालयात ठेवल्याची वार्ता समजताच शाळकरी मुलांनी पाहण्यासाठी गर्दी केली आहे.
नांदेड जिल्ह्यात प्रथमच आढळलली मगर; वनविभागाच्या पथकाने मोठ्या धाडसाने लोहा तालुक्यातील घोटका येथील शेतकऱ्यांच्या शेतात मगरीस पकडले. #nanded#forest#crocodilepic.twitter.com/kiDoUxhHdH
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) February 11, 2025
नैसर्गिक अधिवासात सोडणार
नांदेड जिल्ह्यात पहील्यांदाच मगर सापडली असून ही मगर नर प्रजाती असून अंदाजे वय दिड वर्ष असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. धनराज मुर्कीकर यांनी सांगितले. तर वरिष्ठांचे आदेश येताच मगरीस नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनपाल शंकरराव धोंडगे यांनी दिली.