नांदेड : जिल्ह्यात विनापरवानगी कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या गुजरातच्या दोन कंपन्यांच्या विरोधात नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कंपनीकडून विक्री केलेला १९ लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या पथकाने रविवारी ही कारवाई केली.
जिल्हास्तरीय भरारी पथकप्रमुख डॉ. नीलकुमार एतवडे यांच्यासह गुण नियंत्रण निरीक्षकांनी विनापरवाना, विनापावती कीटकनाशक विक्री करणाऱ्या एव्हलोन क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड, राजकोट आणि श्रीनय ॲग्रो बायोटेक या दोन कंपन्यांच्या विरोधात कारवाई केली आहे.
तसेच कैलास रामचंद्र मुंगडे रा. जांभळेनगर, नायगाव, मारोती भीमराव मुनके (रा. डोणगाव, ता. बिलोली), राजेंद्र अशोकराव भुरे (रा. कुंचेली, ता. नायगाव) यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. या तिघांनीही विनापरवाना कीटकनाशकांची विक्री केली होती. त्यांच्याकडून १९ लाख रुपयांचे कीटकनाशक जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात नांदेड ग्रामीणचे सपोनि. गढवे हे तपास करीत आहेत.