नांदेडात गृहनिर्माण संस्थेच्या १२ जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:29 IST2018-10-27T00:28:40+5:302018-10-27T00:29:36+5:30
कौठा येथील रवीनगर गृहनिर्माण संस्थेचे माजी अध्यक्ष व सचिवांसह १२ सहकाऱ्यांनी बनावट कागदपत्रांद्वारे महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने नांदेड ग्रामीण ठाण्यात गुुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नांदेडात गृहनिर्माण संस्थेच्या १२ जणांविरुद्ध गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
नविन नांदेड : कौठा येथील रवीनगर गृहनिर्माण संस्थेचे माजी अध्यक्ष व सचिवांसह १२ सहकाऱ्यांनी बनावट कागदपत्रांद्वारे महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने नांदेड ग्रामीण ठाण्यात गुुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कौठा येथील रवीनगर गृहनिर्माण संस्थेचे माजी अध्यक्ष सत्यकाम पाठक व डॉ. के. बी. गोरे यांच्यासह डॉ. सुधीर शिवणीकर, संजय पांडे, सविता श्यामराव करूडे, बालाजी गोविंदराव काकडे, दत्तात्रय काळे, लक्ष्मण काळे, शशिकलाबाई बोंपलवाड, अविनाश गादेवार व ज्ञानेश्वर पांचाळ या १२ आरोपींनी ३१ जानेवारी २०१० ते ३० जानेवारी २०१५ दरम्यान, एका प्लॉटचे खोटे प्रमाणपत्र तयार केले.
जानेवारी २०१० ते जानेवारी २०१५ या काळात शांताबाई गणेश पत्तेवार (रा.नायगाव) यांच्या पतीच्या निधनानंतर रवीनगर गृहनिर्माण संस्थेच्याअंतर्गत प्लॉट क्र. २९ हा वारसाहक्काप्रमाणे पत्तेवार यांच्या नावावर केलेला होता. पतीच्या मृत्यूनंतर वारसाहक्काप्रमाणे उपरोल्लेखित प्लॉट पत्नीच्या नावावर केला असतानाही आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करून प्लॉट क्र.२९ ऐवजी प्लॉट क्र.१०६ अशी नोंद करून खोटे प्रमाणपत्र खरे म्हणून ‘ती’ अंमलामध्ये आणून शांताबाई पत्तेवार यांची फसवणूक केली़
याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने १२ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ पो. नि. डी. जी. चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजाभाऊ जाधव हे तपास करीत आहेत़