वयोवृद्ध आईवडिलांना दरमहा पैसे देण्याचे न्यायालयाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 15:11 IST2018-11-07T15:11:05+5:302018-11-07T15:11:40+5:30
वर्षभरापासून विवंचनेत असलेल्या या भगत दाम्पत्याने कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली.

वयोवृद्ध आईवडिलांना दरमहा पैसे देण्याचे न्यायालयाचे आदेश
नांदेड : वयोवृद्ध आईवडिलांचे पालनपोषण करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तीन मुलांनी आई-वडिलांच्या पालनपोषणासाठी दरमहा ९ हजार रुपये पोटगी आई-वडिलांना द्यावेत, असे आदेश नांदेड येथील कौटुंबिक न्यायालयाचे मुख्य न्या़ गोविंद वायाळ यांनी दिले.
नांदेड शहरातील बेलानगर येथील बाबूराव भगत व गंगासागर भगत या दाम्पत्यास संजय, प्रशांत व प्रमोद असे तीन मुले आहेत. ही मुले खाजगी नोकरी, कामे करुन आपला उदरनिर्वाह भागवतात. मात्र त्याचवेळी या तिन्ही मुलांनी आपल्या आईवडिलांच्या पालनपोषणास टाळाटाळ केली. वर्षभरापासून विवंचनेत असलेल्या या भगत दाम्पत्याने कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली. अत्यंत हलाखीचे जीवन जगत असताना तिन्ही मुलांनी आपल्या पालनपोषणाची जबाबदारी घेतली नसल्याची बाब त्यांनी सांगितली.
कौटुंबिक न्यायालयात भगत दाम्पत्याची बाजू अॅड. मंगल पाटील यांनी मांडली. न्यायालयाने साक्षीपुरावा, युक्तिवाद ऐकून वयोवृद्ध आईवडील बाबूराव भगत व गंगासागर भगत यांना तिन्ही मुलांनी प्रत्येकी १५०० रुपये दरमहा पोटगी द्यावे, असे आदेश मुख्य न्या़ गोविंद वायाळ यांनी दिले. या प्रकरणात अॅड. मंगल पाटील यांना अॅड. जी. टी. गेटे, अॅड. बाळासाहेब कांबळे, सुशील लाठकर, महेश संगनोर आदींनी सहकार्य केले.