वसंतराव नाईक महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा १४ ते २८ जानेवारी दरम्यान घेण्यात आला. व्यक्तिमत्त्व विकासासाठी भाषिक काैशल्याची गरज या विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मराठी भाषा व वाड्.मयाच्या अनुषंगाने अवगत करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे संचालक डाॅ. गणेश चंदनशिवे तर प्रमुख पाहुणे म्हणून कवी प्रभाकर साळेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. साळेगावकर म्हणाले, कोरोना काळ भाषा व वाड्.मय यांनी सुसह्य झाला आहे. अनेकांनी अनेक विषयाचे वाचन, लेखन करून दरम्यानच्या काळात भाषेच्या विकासात मोलाची भर घातली आहे. कुणी चित्रं काढले, कुणी तंत्रज्ञान आत्मसात केले.
डाॅ. गणेश चंदनशिवे यांनी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली ‘माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली’ ही कविता सादर केली. यावेळी प्राचार्य डाॅ. शेखर घुंगरवार, डाॅ. दीपक बच्चेवार, डाॅ. पंचशील एकंबेकर, डाॅ. व्ही. एम. देशमुख यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन डाॅ. साहेबराव शिंदे यांनी तर डाॅ. व्यंकटेश देशमुख यांनी आभार मानले.