गळ्यातील चैन हिसकावून पळणाऱ्या चोरट्यास पाठलाग करून पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 13:37 IST2019-09-10T13:32:57+5:302019-09-10T13:37:16+5:30
एका महिलेच्या गळ्यातील चैन ओढून दुचाकीवर चोरटे पसार

गळ्यातील चैन हिसकावून पळणाऱ्या चोरट्यास पाठलाग करून पकडले
नांदेड : शहरातील राज कॉर्नर ते चैतन्यनगर भागात एका महिलेच्या गळ्यातील चैन ओढून दुचाकीवर पसार होणाऱ्या चोरट्यास वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून पकडले़ ही घटना सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली़
नांदेड शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या राज कॉर्नर ते चैतन्यनगर या मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून जाणाऱ्या चोरट्यांनी हिसकावून पळ काढला़ दरम्यान या परिसरात पेट्रोलिंग करत असलेल्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पोबारा ठोकणाऱ्या चोरट्यांचा तत्काळ पाठलाग करून त्यास पकडले़ घटनेनंतर आरडाओरड झाल्यामुळे बघ्याची गर्दी जमली होती़ दरम्यान भाग्यनगर ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली़ यावेळी एएसआय दिलीप भंडारी, पोलिस शिपाई ईश्वर आगलावे, संतोष वाघमारे, सपना शिंदे, जयश्री शेळके यांनी सदर चोरट्यास भाग्यनगर बीट मार्शलच्या ताब्यात दिले़ पुढील कारवाई भाग्यनगर पोलिस करत आहे़ कर्मचाऱ्यांच्या या कामगिरीचे शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी कौतुक केले़