सीबीआयकडून तपासात नांदेड स्फोटाचे २ हजार पानांचे आरोपपत्र तरी सर्व १० आरोपी निर्दोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 13:25 IST2025-01-05T13:22:53+5:302025-01-05T13:25:22+5:30
देशभर गाजलेल्या नांदेड शहरातील पाटबंधारे नगरातील ६ एप्रिल २००६ च्या बॉम्बस्फोट प्रकरणात नांदेड न्यायालयाने सर्व आरोपींची शनिवारी निर्दोष मुक्तता केली आहे.

सीबीआयकडून तपासात नांदेड स्फोटाचे २ हजार पानांचे आरोपपत्र तरी सर्व १० आरोपी निर्दोष
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : देशभर गाजलेल्या नांदेड शहरातील पाटबंधारे नगरातील ६ एप्रिल २००६ च्या बॉम्बस्फोट प्रकरणात नांदेड न्यायालयाने सर्व आरोपींची शनिवारी निर्दोष मुक्तता केली आहे. यातील दोन आरोपींचा स्फोटातच मृत्यू झाला होता, तर दहा जणांवर खटला सुरू होता. तब्बल १८ वर्षांनंतर या बहुचर्चित प्रकरणाचा निकाल लागला. सीबीआयने या प्रकरणात तब्बल २ हजार पानांचे चार्जशीट तयार केले होते, परंतु न्यायालयात त्यांना हा बॉम्बस्फोट असल्याचे सिद्ध करता आले नाही.
नांदेड शहरातील पाटबंधारे नगर भागात ६ एप्रिल २००६ रोजी राजकोंडवार यांच्या घरात मोठा स्फोट झाला होता. पोलिसांनी त्यावेळी घटनास्थळी धाव घेतली. या स्फोटात नरेश राजकोंडवार आणि हिमांशू पानसे यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर मारोती वाघ, योगेश देशपांडे, गुरुराज टोपटीवार आणि राहुल पांडे हे गंभीर जखमी झाले होते. सुरुवातीला हा स्फोट फटाक्यांचा असल्याचे मानले जात होते, परंतु दुसऱ्या दिवशी घराची झाडाझडती घेतल्यानंतर हे प्रकरण एटीएसकडे देण्यात आले. एटीएसकडून हा तपास नंतर सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. तपासादरम्यान आरोपींचा संबंध पूर्णा, परभणी आणि जालना येथील बॉम्बस्फोटांशी असल्याचे पुढे आले. या प्रकरणात त्यात बारा जणांना आरोपी करण्यात आले होते.
शनिवारी नांदेड न्यायालयात या खटल्याचे निकाल लागला. जिल्हा व सत्र न्या. सी. व्ही. मराठे यांनी या खटल्यात ४९ साक्षीदार तपासले. त्यात सीबीआय पाटबंधारे नगर येथील त्या घरात बॉम्बस्फोट झाल्याचे सिद्धच करू शकली नाही. त्या ठिकाणी फटाक्यांचा स्फोट झाला होता, हे ग्राह्य धरून न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. खटल्यात बचाव पक्षाच्या वतीने ॲड. नितीन रुणवाल यांनी बाजू मांडली.
यांच्यावर होता बॉम्बस्फोटाचा आरोप
राहुल पांडे, संजय चौधरी, रामदास मुलंगे, मारोती वाघ, योगेश रवींद्र देशपांडे, गुरुराज तुप्तेवार, मिलिंद एकताटे, मंगेश पांडे, राहुल धावडे आणि जखमींवर उपचाराची माहिती न दिल्याने डॉ. उमेश देशपांडे यांना आरोपी करण्यात आले होते. या सर्व आरोपींची आज न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.